Join us  

१२३ जणांना ‘स्माइल’

By admin | Published: February 01, 2016 1:57 AM

पालकांपासून दुरावलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी केंद्राची आॅपरेशन मुस्कान मोहीम मुंबई पोलिसांकडून पुन्हा ‘मुस्कान २’ या नावाने कार्यान्वित करण्यात आली

मुंबई : पालकांपासून दुरावलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी केंद्राची आॅपरेशन मुस्कान मोहीम मुंबई पोलिसांकडून पुन्हा ‘मुस्कान २’ या नावाने कार्यान्वित करण्यात आली. अवघ्या महिनाभरात हरविलेल्या १४९ मुलांपैकी १२३ मुलांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले. त्यामुळे या चिमुकल्यांची हरविलेले ‘स्माइल’ त्यांना पुन्हा मिळाले. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातून दरवर्षी तीन ते चार हजार मुले गायब होतात. २०१५ च्या नोव्हेबर महिनाअखेरीस १ हजार ५४४ अल्पवयीन मुले आणि मुली हरविल्याची नोंद मुंबई पोलिसांकडे झाली आहे. त्यामध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहेत. यापैकी १ हजार २१८ अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले. मात्र अजूनही अद्याप न सापडलेल्या मुलांचा शोध घेणे पोलिसांसमोर आवाहन आहे. अशात पालकांपासून दुरावलेल्या मुलांचा शोध घेण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला असून त्यांच्या निर्देशानुसार ‘आॅपरेशन मुस्कान’ मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर मुंबई पोलिसांनी जानेवारीपासून ही मोहीम पुन्हा कार्यान्वित करीत ‘मुस्कान २’ ही मोहीम सुरू केली. या वर्षीच्या १ जानेवारी ते २९ जानेवारीपर्यंत १४९ अल्पवयीन मुलांच्या हरविल्याची नोंद पोलीस दफ्तरी झाली. या आॅपरेशनअंतर्गत मुंबई पोलिसांनी १२३ मुलांची सुटका केली. त्यामुळे १२३ मुलांची हरविलेली मुस्कान नव्याने त्यांना मिळाली. यामध्ये ५७ मुले आणि ६६ मुलींची सुटका करण्यात आली आहे. यापैकी ७६ जणांना बालमजूर तर ४ जणांचा वापर भीक मागण्यासाठी केला जात असल्याचे तपासात उघड झाले. उर्वरित मिसिंग मुलांचाही लवकरात लवकर छडा लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)