लाइफलाइन एक्स्प्रेसमध्ये १२.३२ लाख जणांवर उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 01:16 PM2023-09-30T13:16:02+5:302023-09-30T13:17:01+5:30
आतापर्यंत लाइफलाइन एक्स्प्रेसने देशातील १९ राज्यांमध्ये प्रवास केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील कानाकोपऱ्यातील गरिबांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याच्या उद्देशाने १६ जुलै १९९१ रोजी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहिले लाइफलाइन एक्सप्रेस-हॉस्पिटल ऑन व्हील्स सुरू केले.
आतापर्यंत लाइफलाइन एक्स्प्रेसने देशातील १९ राज्यांमध्ये प्रवास केला. १३८ जिल्ह्यांतील २०१ ग्रामीण ठिकाणी जाऊन १.४६ लाख शस्त्रक्रियेसह १२.३२ लाख रुग्णांना वैद्यकीय उपचार प्रदान केले आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांच्या हस्ते शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे लाइफलाइन एक्स्प्रेसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी इम्पॅक्ट इंडिया फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त प्राध्यापक प्रोफेसर डॉ. रोहिणी चौगुले, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मुख्य महाव्यवस्थापक (एचआर) गौतम दत्ता, मध्य रेल्वे प्रधान मुख्य अभियंता राजेश अरोरा, प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी रेणू शर्मा, मुंबई विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक अखलाक अहमद उपस्थित होते.
लाइफलाइन एक्स्प्रेस आता आपल्या पुढच्या प्रकल्पासाठी तुर्कीच्या दिशेने रवाना झाली आहे.
शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटली असून आणि १ ऑक्टोबर रोजी २.०० वाजता दीनदयाल उपाध्याय नगर, उत्तर प्रदेश जवळील तुर्की स्टेशन (भुसावळ, जबलपूर मार्गे) येथे पोहोचेल.
लाइफलाइन एक्स्प्रेस-हॉस्पिटल ऑन व्हील्समध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज, ७ डब्यांची ट्रेन रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणि अगदी शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यकीय व्यावसायिकांच्या (डॉक्टर्स) समर्पित टीमने सुसज्ज आहे.
या एक्स्प्रेसमध्ये १२. ३२ लाख रुग्णांना वैद्यकीय उपचार केले आहेत.
यामध्ये हालचाल, दृष्टी, श्रवण, चेहऱ्यावरील उपचार, एपिलेप्सी, दंत समस्या, कर्करोग आणि इतर अनेक उपचारांचा समावेश आहे, जे मोफत आहेत.
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत रत्नागिरी, बल्लारशाह आणि लातूर येथे प्रकल्प राबवले आहेत.