Join us

मुंबई शहर जिल्ह्याच्या १२४ कोटींच्या आराखड्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्याच्या सन २०२१-२२ या वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या एकूण १२४ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास शनिवारी ...

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्याच्या सन २०२१-२२ या वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या एकूण १२४ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास शनिवारी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत योग्य ते प्रस्ताव मागवून हा निधी १०० टक्के खर्च करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

सन २०२१-२२ च्या प्रारूप आराखड्यात सर्वसाधारण योजनेसाठी १०४ कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १९ कोटी, आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांसाठी १२ लाख असा एकूण १२४ कोटींचा प्रारूप आराखडा मान्य करण्यात आला.

सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, आमदार अमिन पटेल, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा वार्षिक योजना २०१९-२० मध्ये एकूण खर्च १३६ कोटी झाला असून, खर्चाची टक्केवारी सुमारे ९५ टक्के आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रनिकेतनच्या जागेसाठी निधी मिळाला असून, इतर कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच धारावीतील भारतरत्न राजीव गांधी क्रीडा संकुल सरकारने ताब्यात घेऊन धारावीतील मुलांना तेथे प्रवेश द्यावा, अशी मागणीही वर्षा गायकवाड यांनी यावेळी केली.

कोविड संदर्भातील राज्य शासनाच्या नियमांचे पालन करून यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक, महापालिकेचे तसेच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते. यामध्ये विधानपरिषदच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार राहुल शेवाळे, आमदार मनीषा कायंदे, आमदार अजय चौधरी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीस मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सहआयुक्त पी. वेलरासू यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा नियोजन अधिकारी बोरकर यांनी सूत्रसंचालन केले.