१२५ कोटींची भरपाई बिल्डरांकडून वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 08:43 AM2024-03-29T08:43:04+5:302024-03-29T08:43:14+5:30
‘महारेरा’ने गेल्या वर्षी जानेवारीत घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईच्या वसुलीसाठी निवृत्त अपर जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली.
मुंबई : घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईपोटी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) गेल्या १४ महिन्यांत १२५ कोटी रुपये बिल्डरांकडून वसूल केले आहेत. तर, आतापर्यंत एकूण १६० कोटी वसूल केले आहेत. आणखी जोमाने ही वसुली करता यावी, यासाठी यापुढे जारी होणाऱ्या प्रत्येक वाॅरंटमध्ये संबंधित बिल्डरांचा बँक खाते क्रमांकही नमूद केला जाईल. त्यामुळे गरजेनुसार वसुलीसाठी महसूल यंत्रणेला संबंधित बिल्डरांच्या खात्यावरही टाच आणता येईल.
‘महारेरा’ने गेल्या वर्षी जानेवारीत घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईच्या वसुलीसाठी निवृत्त अपर जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. ते सर्व संबंधित जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी यांच्याशी संपर्कात असतात. प्रत्येक खातेप्रमुखांच्या बैठकीत याचा आढावा घेतला जातो. घर खरेदीदारांच्या विविध तक्रारींवर सुनावणी होऊन प्रकरणांनुसार व्याज, नुकसानभरपाई अथवा परतावा देण्याचे आदेश संबंधित बिल्डरांना दिले जातात. बिल्डरांनी दिलेल्या कालावधीत रक्कम न दिल्यास ती वसूल करण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची भूमिका महत्त्वाची असते.
११७ गृह प्रकल्पांतील २३७ तक्रारींपोटी १६९ कोटी वसूल केले आहेत. यापैकी १२५ कोटी गेल्या १४ महिन्यांत वसूल करण्यात आले आहेत.
नुकसान भरपाईसाठी आतापर्यंत ४२१ गृह प्रकल्पांतील ६६१ कोटींच्या वसुलीसाठी १०९५ वाॅरंट जारी केले आहेत. यापैकी आतापर्यंत ११७ प्रकल्पांतील २३७ वाॅरंटपोटी एकूण १५९ कोटी वसूल झाले आहेत.
राज्यात सर्वात जास्त वाॅरंट आणि रक्कम मुंबई उपनगरातील असून ११४ प्रकल्पांतील २९८ कोटींच्या वसुलीसाठी ४३४ वाॅरंट जारी केले आहेत. यापैकी ४० प्रकल्पांतील ७५ वाॅरंटचे ७१ कोटी वसूल झाले आहेत. यानंतर पुण्याचा क्रमांक असून तेथील १२३ प्रकल्पांतील १८१ कोटी वसुलीसाठी २३९ वाॅरंट जारी केले आहेत. यापैकी ३५ प्रकल्पांतील ५५ वाॅरंटपोटी ३८ कोटी वसूल झाले आहेत.