अनिकेत घमंडी, डोंबिवली केंद्र सरकारने रत्ने आणि दागिन्यांवर अबकारी कर आकारण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात देशभरातील सराफांनी तीन दिवसांपासून बंद पुकारला आहे. जिल्ह्यातील सराफा बाजारात प्रतिदिन १२५ कोटींची उलाढाल होते. मात्र, बंदच्या काळात व्यवहार न झाल्याने अब्जावधींची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यातच, आता लग्नाचे काहीच मुहूर्त शिल्लक राहिल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे; तर सराफांसमोर ग्राहकांच्या आॅर्डर कशा पूर्ण करायच्या, असा पेच आहे.सोने, चांदी आणि हिऱ्यांसह अन्य खरेदी-विक्रीतून प्रतिदिन १२५ कोटींची उलाढाल होते, अशी माहिती सराफ सुवर्णकार महामंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष व जेम अॅण्ड ज्वेलरी ट्रेड अॅण्ड फेडरेशनचे आॅल इंडिया संचालक अनिल वाघाडकर यांनी ‘लोकमत’ला दिली. जिल्ह्यात साधारणपणे १२०० ते १३०० सराफा व्यापारी आहेत. तीन दिवसांपासून त्यांनी बंद पुकारला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी ज्वेलर्स असोसिएशनच्या (आॅल इंडिया) शिष्टमंडळाला भेट दिली. या वेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या मागणीचा फेरविचार करून शनिवारी निर्णय दिला जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे शनिवारी निर्णय होईपर्यंत आमचा बंद कायम असेल, असेही वाघाडकर यांनी स्पष्ट केले.केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, दिवसाला ५०० कोटींचा सेझ या व्यवसायातून जमा होतो. त्यावरूनच ज्वेलर्सची उलाढाल किती असेल, हे स्पष्ट होते, असे वाघाडकर म्हणाले. जिल्ह्यातील सराफांच्या पेढ्यांतून दिवसाला २२ ते २३ किलो सोन्याची उलाढाल होते. साधारणपणे ३० लाख रुपयांना एक किलो सोने आहे. ४० हजार रुपये किलो याप्रमाणे चांदीची तसेच हिऱ्यांचीही उलाढाल होते. त्यासाठी २५०० हून अधिक कारागीर व तेवढ्याच कर्मचाऱ्यांचाही त्यात सहभाग आहे. त्यामुळे तीन दिवसांपासून ५ हजारांहून अधिक कामगार-व्यापारी या बंदमुळे घरी बसून असल्याचे ते म्हणाले.
सराफांची प्रतिदिन १२५ कोटींची उलाढाल ठप्प!
By admin | Published: March 05, 2016 1:30 AM