१२५ किलो कचऱ्यापासून तयार होते दर्जेदार खत

By admin | Published: May 23, 2017 02:28 AM2017-05-23T02:28:31+5:302017-05-23T02:28:31+5:30

मुंबई शहरात रोज सुमारे साडेआठ ते नऊ हजार टन कचरा जमा होतो. एकीकडे मुंबईतील डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपलेली आहे तर दुसरीकडे कचऱ्याची कशी विल्हेवाट लावायची

125 kg quality fertilizer prepared from waste | १२५ किलो कचऱ्यापासून तयार होते दर्जेदार खत

१२५ किलो कचऱ्यापासून तयार होते दर्जेदार खत

Next

मनोहर कुंभेजकर  
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहरात रोज सुमारे साडेआठ ते नऊ हजार टन कचरा जमा होतो. एकीकडे मुंबईतील डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपलेली आहे तर दुसरीकडे कचऱ्याची कशी विल्हेवाट लावायची, असा प्रश्न भेडसावत आहे. पालिका प्रशासन रोजच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्नशील असली तरी नागरिकांचाही सहभाग या कामी मोलाचा आहे. गोरेगाव पूर्व येथील नागरी निवारा एकता समितीने प्लॉट २, ३ आणि ४ येथील कृष्णा सोसायटीत राबवलेला शून्य कचरा प्रकल्प एक आदर्श प्रकल्प ठरला आहे.
ओला-सुका कचरा वेगळा करून पालिकेला सहकार्य करा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून नेहमीच केले जाते. तथापि, कृष्णा गृहनिर्माण संस्थेतील २४० सदनिकाधारकांनी एकत्र येऊन या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यासाठी कृष्णा सोसायटीतील पुरुष आणि महिलांची एक टीम बनवून पथनाट्याद्वारे जनजागृतीही केली जात आहे. ओला-सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देऊन हा कचरा वेगळा करण्याचे आवाहनदेखील या गृहनिर्माण संस्थेकडून केले जाते. विशेष म्हणजे यशस्वी अंमलबजावणी केल्याने या परिसरातील झाडेदेखील टवटवीत झाली आहेत.
या योजनेला दिंडोशीचे शिवसेनेचे आमदार आणि विभागप्रमुख सुनील प्रभू, माजी नगरसेवक सदाशिव पाटील, मनीषा पाटील यांनीदेखील मोलाचे सहकार्य केले. या योजनेचा शुभारंभ आमदार प्रभू यांच्या हस्ते गेल्या वर्षीच्या दिवाळीत करण्यात आला. मनीषा पाटील यांच्या नगरसेवक निधीतून ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी येथील २४० सदनिकाधारकांना कचऱ्याचे प्रत्येकी दोन डबे देण्यात आले होते. या डब्यांचा येथील नागरिकांनी योग्य वापर केल्याचे समितीचे अध्यक्ष संतोष मोरे, सचिव सुरेंद्र शिंदे यांनी सांगितले.
या योजनेला कृष्णा नागरी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष शैलेश पेडामकर, खजिनदार विजय गुरव, राजेंद्र खामकर आणि प्रमोद शिंदे व सर्व कार्यकारिणी सदस्य तसेच नागरी निवारा एकता समितीचे अध्यक्ष संतोष मोरे, खजिनदार दत्तात्रय आचरेकर यांनी मोलाचे सहकार्य केले. तर समितीचे सचिव सुरेंद्र शिंदे यांच्या सहकार्यातून राबवलेली ही शून्य कचरा मोहीम दिंडोशी विधानसभा क्षेत्रासाठी एक आदर्श ठरल्याचे आमदार प्रभू यांनी म्हटले आहे. मालमत्ता कर वेळेवर भरणाऱ्या नागरिकांना करात सूट देण्याची पालिका प्रशासनाने नुकतीच घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे शून्य कचरा मोहीम यशस्वीपणे राबविणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पालिकेने करात सवलत देण्याची मागणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे करणार असल्याचे आमदार प्रभू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: 125 kg quality fertilizer prepared from waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.