दसरा ते दिवाळी दरम्यान मुंबईत १२,६०० मालमत्तांची नोंदणी, गेल्यावर्षीपेक्षा ३० टक्क्यांनी वाढ
By मनोज गडनीस | Published: November 16, 2023 08:27 PM2023-11-16T20:27:16+5:302023-11-16T20:28:54+5:30
या मालमत्तांमध्ये कार्यालयांपेक्षा घरांच्या विक्रीचे प्रमाण अधिक आहे.
मुंबई - दसरा ते दिवाळी या दोन मोठ्या सणांदरम्यान मुंबईमध्ये मालमत्ता (घर व कार्यालये) विक्रीने नवा उच्चांक प्रस्थापित केला असून या कालावधीमध्ये मुंबईत एकूण १२ हजार ६०० मालमत्तांची नोंदणी झाली आहे. गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हा आकडा ३० टक्के अधिक आहे. या मालमत्तांमध्ये कार्यालयांपेक्षा घरांच्या विक्रीचे प्रमाण अधिक आहे.
बांधकाम क्षेत्रातील घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या नाईट फ्रँक या अग्रगण्य कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, १५ ऑक्टोबर (दसरा) ते १५ नोव्हेंबर (भाऊबीज) या कालावधीमध्ये १२ हजार ६०० मालमत्तांच्या विक्रीचे व्यवहार झाले आहेत. यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये १२५७ कोटी रुपयांची भर पडली आहे.
गेल्यावर्षी अर्थात २०२२ या वर्षामध्ये दसरा ते दिवाळी दरम्यान एकूण ९६५९ मालमत्तांची विक्री झाली होती. त्यावेळी दिवसाकाठी ३२२ मालमत्तांची विक्री झाली होती ती संख्या यावेळी दिवसाकाठी ४०७ एवढी झाली आहे. या मागची कारणमीमांसा अशी की, गेल्या काही महिन्यांपासून व्याजदर स्थिर राहिले आहेत. तसेच, लोकांची स्वतःचे घर खरेदी करण्याची इच्छा देखील वाढीस लागत आहे.
त्यातच दसरा व दिवाळी दरम्यान घरांची विक्री करताना अनेक बिल्डर मंडळींनी मोठ्या प्रमाणावर सूट योजना जाहीर केल्या आहेत. स्टँम्प ड्युटी, नोंदणी, जीएसटी सारख्या कराच्या रकमेचा भार देखील स्वतः उचलण्याची घोषणा केली तर पैसे स्वीकारण्यासाठी देखील आकर्षक टप्पे ग्राहकांना उपलब्ध करून दिले. यामुळे लोकांना घर खरेदी तुलनेने सुलभ वाटत आहे.
यातील दुसरा मुद्दा असा की, केवळ पहिल्यांदा स्वतःचे घर घेणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली असतानाच, विद्यमान घराची विक्री करून अथवा ते ठेवून दुसरे मोठे घर घेण्याचा कल देखील वाढीस लागला आहे. मुंबईत गेल्या १० महिन्यांत ज्या घरांची विक्री झाली त्यामध्ये टू बीएच के किंवा त्यापेक्षा अधिक आकारमानाच्या घरांची संख्या लक्षणीय आहे.