मध्य रेल्वेच्या सहामाही पासविक्रीत १२७ पट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:48 AM2017-08-15T01:48:31+5:302017-08-15T01:48:33+5:30
शहरात वाहतुकीसाठी दर्जेदार पर्याय ठरलेली मध्य रेल्वेने सहामाही पास विक्रीत नवीन उच्चांक गाठला आहे.
मुंबई : शहरात वाहतुकीसाठी दर्जेदार पर्याय ठरलेली मध्य रेल्वेने सहामाही पास विक्रीत नवीन उच्चांक गाठला आहे. यंदाच्या जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सहामाही पास विक्रीत तब्बल १२७.४५ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. मध्य रेल्वेला केवळ सहामाही पासमधून ५३ लाख ५१ हजार ५६४ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. परिणामी जुलै महिन्यात मध्य रेल्वे मालामाल झाल्याचे दिसून आले.
दैनंदिन प्रवासासाठी पासची सुविधा मध्य रेल्वेने उपलब्ध केली आहे. यात मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक असे पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. शहरात सुरु असलेल्या विविध प्रकल्प कामांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे इंधनासह वेळेचा ही अपव्यय होतो. परिणामी सोईस्कर आणि आरामदायी प्रवासासाठी प्रवासी रेल्वेला प्रथम पसंती देतात. यंदाच्या जुलै (२०१७-१८) महिन्यात ७ हजार ४९९ पासची विक्री करण्यात आली. यातून मध्य रेल्वेने तब्बल ५३ लाख ५१ हजार ५६४ रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या पास विक्रीत तब्बल १२७.४५ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. गतवर्षी जुलै (२०१६-१७) महिन्यात ३ हजार २९७ पास विक्री करण्यात आली. त्यातून ४३ लाख ५२ हजार ७४३ रुपये आर्थिक उत्पन्न मिळाले होते, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली. सहामाही पासमध्ये प्रवाशांना सवलत दिली जाते. त्यामुळे सहामाही पास काढल्यास प्रवाशांना फायदा होतो. पासच्या रांगेतून देखील सुटका मिळते. सहामाही पासची एकूण किंमत आणि एकूण दिवस यांचा विचार केल्यास केवळ नाममात्र प्रवास भाडे आकारल्याची बाब समोर येते.
तिकिट प्रकार जुलै (२०१७-१८) जुलै (२०१६-१७) वाढ (टक्क्यांमध्ये)
( लाखांत) (लाखांत)
प्रवासी तिकिट २७,७४६,६८८ २६,४०९,६२३ ५.०६
मासिक पास (एमएसटी) १२,८२,१५४ १२,२९,२०४ ४.३१
त्रैमासिक पास (क्यूएसटी) १,४९,००८ १४२६७६ ४.४४
सहामाही पास (एचएसटी) ७,४९९ ३,२९७ १२७.४५
वार्षिक पास (वायएसटी) ७७६ ७३७ ५.२९