मुंबईत आढळले ‘डेल्टा’चे १२८ रुग्ण; काळजी घेण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 07:58 AM2021-08-24T07:58:40+5:302021-08-24T07:58:51+5:30
Corona Virus delta varient: डेल्टा विषाणूची चाचणी यापूर्वी पुणे येथील प्रयोगशाळेत होत होती. यामध्ये दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागत असल्याने महापालिकेने अमेरिकेतून यंत्रणा आणली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड-१९ विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणारी वैद्यकीय यंत्रणा मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या पहिल्या चाचणीच्या १८८ नमुन्यांमध्ये १२८ रुग्ण हे ‘डेल्टा’ बाधित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. डेल्टा विषाणूचा वेगाने प्रसार होत असल्याने कोविड प्रतिबंधक नियमावली पाळण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
डेल्टा विषाणूची चाचणी यापूर्वी पुणे येथील प्रयोगशाळेत होत होती. यामध्ये दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागत असल्याने महापालिकेने अमेरिकेतून यंत्रणा आणली. कस्तुरबा रुग्णालयातील पहिल्या तुकडीतील १८८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १२८ रुग्ण हे ‘डेल्टा’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित अल्फा प्रकाराचे दोन, केपा प्रकाराचे २४ तर इतर रुग्ण हे सर्वसाधारण कोविड विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे.
ही तीन सूत्रे पाळा !
मास्कचा वापर, सुरक्षित अंतर राखणे, हातांची नियमित स्वच्छता, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले.
अशी आहे यंत्रणा...
nया वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये जनुकीय सूत्र निर्धारण करू शकणारे दोन संयंत्र आहेत.
अमेरिकेतील इलुम्निया या कंपनीने, अमेरिकेतीलच अल्ब्राईट स्टोनब्रिज ग्रुप (ए. एस. जी. - बोस्टन) या संस्थेच्या माध्यमातून हे दोन जीनोम सिक्वेसिंग संयंत्र
महापालिकेला दिले आहे.
nविषाणूंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्याने, एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता येतो. असा फरक ओळखू आल्यानंतर उपचार पद्धतीची नेमकी दिशा स्पष्ट होते.
nया लॅबमध्ये एकाचवेळी सुमारे ३८४ वैद्यकीय नमुन्यांची तपासणी होऊन चार दिवसांच्या आत निष्कर्ष प्राप्त होऊ शकतात.