भटक्या कुत्र्यांचे १२९८ जणांना चावे

By admin | Published: March 27, 2015 10:59 PM2015-03-27T22:59:22+5:302015-03-27T22:59:22+5:30

मागील एका महिन्यात शहराच्या विविध भागांत तब्बल १२९८ जणांचे लचके भटक्या कुत्र्यांनी तोडले आहेत.

1298 wanders for dogs | भटक्या कुत्र्यांचे १२९८ जणांना चावे

भटक्या कुत्र्यांचे १२९८ जणांना चावे

Next

अजित मांडके ल्ल ठाणे
मागील एका महिन्यात शहराच्या विविध भागांत तब्बल १२९८ जणांचे लचके भटक्या कुत्र्यांनी तोडले आहेत. मुंब्य्रात मागील वर्षी जुलै महिन्यात एका नऊवर्षीय मुलाचा चावा घेतल्यानंतर पुन्हा गुरुवारी याच परिसरात एका अडीचवर्षीय मुलाचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे त्यामुळे ठाण्यात पुन्हा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परंतु, मुंब्रा भागात वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने आणि येथे दुर्गंधी असल्याने कुत्र्यांची संख्या या भागात अधिक झाल्याचे सांगत आरोग्य विभागाने याचे खापर घनकचरा विभागावर फोडले आहे.

गुरुवारी आपल्या नातेवाइकांकडे आलेल्या अहमद मुश्ताक खान या अडीचवर्षीय मुलाचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडले आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षी जुलै महिन्यात मुंब्य्रातच शाहीद हसीन अहमद सय्यद या नऊवर्षीय बालकाला भटकी कुत्री चावल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली होती. ठाण्यात त्याच्यावर उपचार होऊ न शकल्याने त्याला मुंबईला हलविण्यात आले होते. त्यानंतर, स्थायी समिती आणि महासभेत भटक्या कुत्र्यांच्या मुद्यावरून सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यातही, भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने राबविलेल्या निर्बीजीकरणाच्या प्रक्रियेतही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सदस्यांनी करून प्रशासनाला अडचणीत आणले होते. तसेच ज्या मुलाला भटक्या कुत्र्यांनी चावे घेतले होते, त्याला एक लाखाची नुकसानभरपाई देण्याच्या सूचना तत्कालीन महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी दिल्या होत्या. परंतु, आजही त्याला ही मदत मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

मागील एका महिन्यात शहराच्या विविध भागांत आणि २५ आरोग्य केंद्रांच्या हद्दीत तब्बल १२९८ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मार्च २०१४ ते २०१५ या एका वर्षात ५०७४ भटक्या कुत्र्यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच २०१० ते २०१३ या कालावधीत २०१०२ आणि २००३ ते २०१० या कालावधीत १९५०१ भटक्या कुत्र्यांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. परंतु, आजही सुमारे २० हजारांच्या आसपास भटक्या कुत्र्यांच्या शस्त्रक्रिया शिल्लक असून त्या करण्यासाठी भटक्या कुत्र्यांना पकडण्यास एकच स्क्वॉड असून त्यामध्ये पाच कर्मचारी काम करतात. विशेष म्हणजे या स्कॉडकडे एकच डॉग व्हॅन असून ती दिवा ते घोडबंदर असा प्रवास करते. दिवसाला सुमारे २५ कुत्रे या डॉग व्हॅनच्या माध्यमातून पकडले जातात. २०१३ मध्ये आणखी एक डॉग व्हॅन प्रशासनाने मागितली होती. परंतु, ती अद्यापही देण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. असे असले तरी मुंबा आणि दिवा भागांत रस्त्यावर उघड्यावर पडणाऱ्या कचऱ्यामुळे आणि दुर्गंधीमुळेच कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे मत आरोग्य विभागाने व्यक्त केले आहे.

४भटक्या कुत्र्यांचे दुचाकीवरून सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने मागील वर्षी पुढे आणला होता. परंतु, निधीअभावी हा प्रस्ताव कागदावरच राहिला आहे. त्याला अद्यापही गती मिळाली नसल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. त्यामुळे शहरात आजघडीला किती भटके कुत्रे आहेत, याची स्पष्ट आकडेवारी पालिकेकडेसुद्धा नाही.

मागील महिन्यात दिवा आणि मुंब्य्रातील रहिवाशांची एक बैठक पालिकेने घेतली होती. दिव्यातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार पालिका १० कुत्रे पकडून नेते आणि १५ कुत्रे सोडते. आमच्या येथील कुत्रे हे जंगलात सोडून द्या, असे मत मुंब्य्रातील रहिवाशांनी व्यक्त केले आहे. परंतु, आम्ही जेवढे कुत्रे पकडून नेतो, तेवढेच पुन्हा त्या भागात सोडले जातात. तसेच कुत्र्यांना जंगलात सोडू शकत नसल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

Web Title: 1298 wanders for dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.