Join us  

"शरद पवारांवर टीका करण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या साडे १३ कोटी जनतेला"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 7:03 PM

शहाजी बापू पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विधानाचा संदर्भ देत शरद पवारांबद्दल बोलण्याचा अधिकार महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेला असल्याचं म्हटलं.

मुंबई - शिवसेनेचा दसरा मेळावा केवळ दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करणारा शिंदे गट आमने सामने आलेले आहेत. दोन्ही गटांकडून आपला मेळावा जोरदार व्हावा यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यासाठी, शिंदे गटाचे नेते, उपनेते मुंबईत दौऱ्यावर आहेत. आमदार शहाजीबापू पाटील यांनीही मुंबईत आल्यानंतर शिवसेना आमचीच असे म्हणत आमचाच दसरा मेळावा खरा आणि बाळासाहेबांच्या विचारांचा असल्याचं म्हटलं आहे. त्यासोबतच, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही भाष्य केलं.  

शहाजी बापू पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विधानाचा संदर्भ देत शरद पवारांबद्दल बोलण्याचा अधिकार महाराष्ट्रातील साडे १३ कोटी जनतेला असल्याचं म्हटलं. शरद पवारांएवढी माझी पात्रता नाही, पण त्यांच्याएवढं होण्यासाठीच निघालोय असे शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं. राजकारणात कोणाची पात्रता किती आहे, हे आजमावणं आता सोप्प राहिलेलं नाही. शरद पवारांएवढी माझी पात्रता नाही ही वास्तवता जरी असली, तरी पवारसाहेबांच्या बरोबरीने नेतृत्व करायला मी निघालोय. गावच्या ग्रामपंचायत सदस्याला देखील शरद पवार, सोनिया गांधी, नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्याचा अधिकार आहे, तो कोणीही हिरावून घेण्याचा प्रयत्न करु नये, असे म्हणत शरद पवारांवर टीका करण्याचा अधिकार असल्याचं पाटील म्हणाले. 

पवारसाहेबांवर बोलायचं नाय, मग बोलायचं कोणावर आम्ही? शरद पवारांचं नेतृत्व एकट्या अजित पवारांनी स्वत;ची मालकी करुन घेण्याचं कारण नाही. शरद पवार राज्याचे नेते आहेत, देशाचे नेते आहेत. त्यामुळे, त्यांच्याबद्दल चांगलं बोलायचा अधिकार आहे, आणि त्यांच्यावर टिकाही करायचा अधिकार आहे. राज्यातील साडे १३ कोटी जनतेला हा अधिकार आहे, असेही पाटील यांनी यावेळी म्हटले.  

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसआमदारअजित पवार