Join us  

शुक्रवारी १३ सिनेमांची जत्रा!

By संजय घावरे | Published: February 28, 2024 5:28 PM

येत्या शुक्रवारी म्हणजेच मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तब्बल १३ हिंदी-मराठी सिनेमे रिलीज होणार आहेत. या जोडीला दाक्षिणात्य सिनेमेही आहेत.

मुंबई - जानेवारी-फेब्रुवारी या सुरुवातीच्या दोन महिन्यांमध्ये बॅाक्स आॅफिसवर फार सिनेमे रिलीज झाले नाहीत, पण मार्चमध्ये मात्र ही उणीव भरून निघणार आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तब्बल १३ हिंदी-मराठी सिनेमे रिलीज होणार आहेत. या जोडीला दाक्षिणात्य सिनेमेही आहेत.

१ मार्च रोजी बॅाक्स ऑफिसवर आठ हिंदी आणि पाच मराठी चित्रपट रिलीज होणार आहेत. यात 'लापता लेडीज', 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन', 'कागज २', 'अॅक्सिडेंट ऑर कॅान्स्पिरसी : गोध्रा', 'दंगे', 'रक्षणम', 'कुसुम का बियाह', 'व्हॅाट अ किस्मत' हे हिंदी, तर 'हि अनोखी गाठ', 'लग्न कल्लोळ', 'मन येड्यागत झालं', 'माणसाचं रान', 'दंगा' हे मराठी चित्रपट आहेत. याखेरीज तेलुगू 'चारी १११' सिनेमाही आहे. हिंदी चित्रपटांमध्ये आमिर खान प्रोडक्शनच्या किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज'ची हवा आहे. यात स्पर्श श्रीवास्तव, नितांशी गायल, प्रतिभा रत्न, छाया कदम, रवी किशन अशी स्टारकास्ट आहे. वरुण तेज आणि मानुषी छिल्लर यांची जोडी 'आॅपरेशन व्हॅलेंटाईन'मध्ये आहे. तेलुगूसह हिंदीतही रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन शक्ती प्रताप सिंग हाडा यांनी केले आहे. बिजॅाय नाम्बियार दिग्दर्शित 'दंगे' हा चित्रपट कॅालेज विश्व आणि त्या काळातील दंगा-मस्तीवर आधारलेला आहे. या अॅक्शन ड्रामामध्ये हर्षवर्धन राणेसोबत निकिता दत्ता आणि एहान भट आहेत. व्हि. के. प्रकाश दिग्दर्शित  'कागज २' या सोशल ड्रामामध्ये अनुपम खेर यांच्या जोडीला दिवंगत अभिनेते सतिश कौशिक दिसणार आहेत. 'व्हॅाट अ किस्मत' हा कॅामेडी ड्रामा मोहन आझाद यांनी दिग्दर्शित केला आहे. बिहारची पार्श्वभूमी असलेली कथा सुवेंदू घोष यांच्या 'कुसुम का बियाह'मध्ये आहे. दिग्दर्शक एम. के. शिवआकाश यांनी अपघात किंवा कट असे म्हणत बहुचर्चित गोध्रा हत्याकांडावर प्रकाश टाकला असून, यात मनोज जोशी व रणवीर शौरींसारखे कलाकार आहेत. देसू विवेक नारायण यांनी दिग्दर्शित केलेला 'रक्षणम' हा अॅक्शन ड्रामाही या शुक्रवारी रिलीज होणार आहे.

'हि अनोखी गाठ' विरुद्ध 'लग्न कल्लोळ'!

'हि अनोखी गाठ' आणि 'लग्नकल्लोळ' या दोन्ही चित्रपटांच्या शीर्षकात लग्न हा विषय समान असला तरी दोन्ही चित्रपटांच्या कथा अतिशय भिन्न आहेत. 'हि अनोखी गाठ'चे दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केले असून, त्यात श्रेयस तळपदेसारख्या तगड्या अभिनेत्यासोबत 'पांघरूण' फेम गौरी इंगवले आहे. मोहम्मद बर्मावाला आणि डॉ. मयुर तिरमखे दिग्दर्शित 'लग्न कल्लोळ'मध्ये सिद्धार्थ जाधव, मयुरी देशमुख, भूषण प्रधान आहेत. 'मन येड्यागत झालं', 'माणसाचं रान' आणि 'दंगा' या तीन चित्रपटांमध्ये नवोदित चेहरे आहेत.

पाहायचा तरी कोणता?

रिलीज होणाऱ्या सर्व चित्रपटांचे विषय भिन्न असून, जॅानर आणि पार्श्वभूमीही वेगवेगळी आहे. त्यामुळे यांची आपसात तुलना होणार नाही, पण यातला नेमका पाहायचा तरी कोणता चित्रपट? असा प्रश्न प्रेक्षकांना पडेल. अशा वेळी दिग्दर्शकाचे नाव आणि कलाकार पाहून चित्रपट पाहण्याला प्रेक्षक प्राधान्य देतात असे जाणकारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :बॉलिवूडसिनेमा