Join us

शुक्रवारपासून साडे तेरा लाख केशरी रेशन कार्ड धारकांना धान्य मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 6:39 PM

राज्य सरकारने केशरी शिधापत्रिका धारकांना ८ रुपये किलो दराने गहू व १२ रुपये किलो दराने तांदूळ देण्याचा निर्णय घेतला.

 

खलील गिरकर

मुंबई :   कोरोनामुळे देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद पडल्याने, वेतन न मिळाल्याने अनेक नागरिकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडू लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या पात्र शिधापत्रिका धारकांना प्रति माणसी पाच किलो विनामूल्य तांदूळ वाटपाची घोषणा केली. राज्य सरकारने केशरी शिधापत्रिका धारकांना ८ रुपये किलो दराने गहू व १२ रुपये किलो दराने तांदूळ देण्याचा निर्णय घेतला. एक मे पासून हे धान्य वाटप करण्यात येणार होते. मात्र नागरिकांना सध्या त्याची गरज असल्याने शिधावाटप कार्यालयाने युध्दपातळीवर काम करुन वाटपाची तयारी पूर्ण केली आहे.  शुक्रवारी २४ एप्रिल पासून १३ लाख ६५ हजार केशरी शिधापत्रिकाधारक ५७ लाख लोकसंख्येला गहू व तांदूळ वाटप सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई ठाणे विभागाचे शिधावाटप नियंत्रक तथा अन्न व नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी दिली. केशरी शिधापत्रिका धारकांना ३० हजार मेट्रिक टन धान्य वाटप करण्यात येणार आहे.केशरी रेशन कार्ड धारकांना प्रति माणसी ३ किलो तांदूळ व २ किलो गहू मिळणार. राज्य सरकारने केशरी शिधापत्रिका धारकांना (ज्यांचे उत्पन्न ५९ हजारपेक्षा जास्त आहे) जे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यामध्ये पात्र नाहीत त्यांना मे व जून महिन्यासाठी प्रति माणसी तीन किलो तांदूळ प्रति किलो १२ रुपये दराने व ८ रुपये दराने दोन किलो गहू देण्यात येणार आहे. यामध्ये १३ लाख ६५ हजार शिधापत्रिका धारक असून त्यामध्ये सुमारे ५७ लाख नागरिकांची नोंद आहे. ३८० ट्रक द्वारे धान्य उचल, केशरी रेशन धारकांसाठी ३० हजार मेट्रिक टन वाटप नेहमी १५० ट्रक द्वारे उचल करण्यात येत होती मात्र यावेळी काम तिप्पट वाढलेले असल्याने सुमारे ३८० पेक्षा जास्त ट्रकद्वारे धान्य उचल केली जात आहे. ३७ हजार मेट्रिक टन दरमहा वाटप केले जाते.  २३ हजार मेट्रिक टन तांदूळ वाटप करण्यात आले. केशरी शिधापत्रिका धारकांना ३० हजार मेट्रिक टन धान्य वाटप करण्यात येणार आहे. मुंबई ठाण्यातील सुमारे दीड कोटी नागरिकांसाठी आमचे काम चालले आहे.  नेहमीपेक्षा सुमारे अडीचपट काम वाढलेले आहे मात्र कर्मचारी आनंदाने हे काम करत आहेत.

वितरणाची तयारी पूर्ण : एफसीआयला पैसे भरण्यात आले असून तांदूळ व गहूची उचल सुरु करण्यात आली आहे. दररोज सुमारे आठ टक्के धान्य उचलले जाते. प्रत्येक दुकानात सुमारे ३० टक्के धान्य पोचले की वितरणाला प्रारंभ करण्यात येणार आहे. मुंबई व ठाणे मधील ४ हजार २२३ रेशन दुकानांद्वारे हे वाटप करण्यात येणार आहे. शुभ्र रेशन कार्ड धारकांबाबत अद्याप राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही.राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यातील पात्र नागरिकांना विनामूल्य तांदूळ वाटप ६५ टक्के पूर्ण : केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रति माणसी पाच किलो तांदूळ विनामूल्य देण्यास १२ एप्रिल पासून प्रारंभ करण्यात आला. त्याचे सुमारे ६५ टक्के वितरण पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यामध्ये जे अंत्योदय  व प्राधान्यगट कुटुंबांना हे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये १९ लाख ४७ हजार ८८१ शिधापत्रिका आहेत. त्यामध्ये ८६ लाख ८१ हजार ७४९ लोकसंख्या नोंदवण्यात आलेली आहे. मुंबई ठाणे रेशनिंग विभागात परळ, अंधेरी, वडाळा, कांदिवली, ठाणे या पाच उप विभागाचा समावेश होतो.  याशिवाय नियमित स्वरुपात त्यांना एक एप्रिल पासून त्यांना धान्य वाटप करण्यास प्रारंभ झाला. दोन रुपये दराने तीन किलो गहू व तीन रुपये दराने दोन किलो तांदूळ वितरण करण्यात आले. ११ एप्रिल पर्यंत सुमारे ९० टक्के लोकांना त्याचे वाटप करण्यात आले आहे.गैरव्यवहार करणाऱ्या सात दुकानदारांविरोधात कारवाई : ज्या रेशन दुकानांबाबत गैरव्यवहारांच्या तक्रारी आल्या आहेत त्यांच्याविरोधात विभागाने कारवाई केली आहे. सात दुकानदारांविरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्याद्वारे पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर दोन दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. ४४ दक्षता पथकांच्या माध्यमातून गैरव्यवहार करणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई केली जात आहे. 

सोशल डिस्टन्सिंग साठी दुकानाची वेळ वाढवली : सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत दुकान सुरु ठेवावे व दररोज सुमारे ६० जणांना धान्य द्यावे असे निर्देश दुकानदारांना देण्यात आले आहेत. टोकन देऊन ग्राहकांना बोलावले जाते व सोशल डिस्टन्सिंग केले जाते. 

 

 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्या