दहाव्या मजल्याच्या खिडकीतून शिरून लुटले 13 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 07:35 AM2021-08-09T07:35:39+5:302021-08-09T07:35:54+5:30
सीसीटीव्हीच्या मदतीने शोध सुरू
मुंबई : चोराने दहाव्या मजल्यावरील घराच्या बाथरूमच्या खिडकीतून प्रवेश करत घरफोडी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ओडिशामध्ये राहणाऱ्या १०८ वर्षीय आजीच्या अंत्यविधीसाठी घर बंद ठेवून गेलेल्या कुंभारवाड्यातील बेहरा कुटुंबीयांच्या घरातून चोरट्यानी १२ लाख ८९ हजार रुपये किमतीचे दागिने, पैसे चोरी केले आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंदवत व्ही.पी. रोड पोलीस अधिक तपास करत आहेत.
कुंभारवाडा येथील लकडावाला सफायर इमारतीच्या दहाव्या मजल्यावर राहणारे राहुल बेहरा (३२) यांच्या घरात ही घरफोडी झाली आहे. ते रेल्वेमध्ये मालाचे क्लीअरिंग एजंट म्हणून काम करतात. २२ जुलै रोजी त्यांची १०८ वर्षीय आजी लक्ष्मीप्रिया बेहेरा यांचे निधन झाले. त्या ओडिसाला राहण्यास होत्या. आजीच्या अंत्यविधीसाठी संपूर्ण कुटुंबीय २२ तारखेला गावी गेले.
अंत्यविधी उरकून ५ ऑगस्ट रोजी ते घरी परतले. तेव्हा घराचे आतील दरवाजे उघडे होते. त्यांनी बेडरूममधील सामानाकडे धाव घेतली. तेव्हा, कपाटातील सोन्या, चांदीचे दागिने, तसेच पैसे गायब असल्याचे दिसून आले, तसेच सामानही अस्ताव्यस्त पडलेले होते.
बाथरूममधील खिडकीच्या काचा फुटलेल्या दिसल्या. येथूनच चोरट्यांनी आत प्रवेश करत ही चोरी केल्याचे समजताच पोलिसांना याबाबत माहिती दिली. २ लाख ८८ हजार रुपयांची रोकड आणि सोने, चांदीचे दागिने, असा एकूण १२ लाख ८९ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. चोराने बाथरूमच्या खिडकीतून प्रवेश केल्याचा संशय तक्रारदारांना आहे. याबाबत व्ही.पी. रोड पोलीस परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.