मुंबई : कोरोनामुक्तीच्या मार्गावर असलेल्या माहीम विभागात बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी या भागात १३ बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा आता ११८ वर पोहोचला आहे. धारावी आणि दादर या आसपासच्या परिसरातही अनुक्रमे सहा आणि तीन बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जी उत्तर विभागाने बाधित परिसराचे निर्जंतुकीकरण, जास्तीजास्त चाचण्या आणि जनजागृती यावर भर दिला आहे.
मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर एप्रिल महिन्यात धारावी, माहीम, दादर हे परिसर हॉट स्पॉट बनले होते. मात्र अनेक उपाय योजनांनंतर जी उत्तर विभागातील कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला होता. धारावीत सहावेळा तर दादर आणि माहीममध्ये तीन वेळा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुक्तीच्या धारावी पॅटर्न, तर जगात ठसा उमटवला. मात्र गेल्या दोन आठवड्यांत जी उत्तर विभागातील रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
* अशा आहेत उपाययोजना
विभागस्तरावर कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. माहीममध्ये अधिक जोखीम असलेल्या क्षेत्रात फिरत्या वाहनामार्फत चाचण्या केल्या जात आहेत. तसेच येथील व्यापारी आस्थापनांमधील मालक, चालक व इतर कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. जी/उत्तर विभाग व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने "मिशन झिरो" कार्यक्रम राबवला जात आहे. सतत हात धुणे, मास्क लावणे आणि सामाजिक अंतर पाळणे गरजेचे असल्याचे जनजागृती करण्यात येत आहे.
* जी उत्तर विभागातील आजची स्थिती
परिसर...आजचे रुग्ण..एकूणबाधित..डिस्चार्ज...सक्रिय
दादर ...०३.... ५०२६...४७६६....९४
धारावी... ०६....४००५.... ३६६८... २१
माहीम.... १३... ४९०५.... ११८.... ४६३३