मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. विशेषत: धारावीत पुन्हा कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून पालिका काम करीत असली तरी रविवारी धारावीत कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. दादर येथे तीन आणि माहीम येथे कोरोनाचे सात रुग्ण आढळून आले आहेत. या विभागात एकूण दिवसभरात कोरोनाचे तेरा रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत धारावी मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. सरकार, मनपा, लोकप्रतिनिधी, संस्था आणि जनता यांच्या एकत्रित प्रयत्नांनी धारावीने यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली. आता कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग पकडला आहे. धारावीत लसीकरण मोहिमेचा धडका सुरू असून, कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी धारावीत लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. चेंज द व्हायरस, मिशन झीरो, ट्रेसिंग-ट्रॅकिंग-टेस्टिंग-ट्रिटिंग या चतु:सूत्रीनुसार प्रयत्नांना यश येत असून, धारावी येथे या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या कमी नोंदविण्यात येत आहे.