Join us  

मुंबईत सहा महिन्यांत १३ पादचारी पूल; मध्य, पश्चिम रेल्वेवरील प्रवासी सुविधांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 2:04 AM

मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील पादचारी पूल, आपत्कालीन वैद्यकीय कक्ष, तिकीट बुकिंग कार्यालय, लिफ्ट, सरकते जिने आणि अत्याधुनिक सुलभ शौचालय या प्रवासी सुविधांचे बुधवारी लोकार्पण करण्यात आले. रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहाँइ यांच्या हस्ते या सुविधांचे ‘ई-अनावरण’ करण्यात आले. तसेच मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर जून २०१८पर्यंत एकूण १३ नवीन पादचारी पूल प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार असल्याची घोषणा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी केली.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे बुधवारी प्रवासी लोकार्पण सुविधा कार्यक्रम पार पडला. या वेळी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता, खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार अरविंद सावंत यांच्यासह मध्य आणि पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपस्थित होते.एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर उपनगरीय रेल्वे स्थानकावर पादचारी पुलांचा समावेश हा अनिवार्य गटात करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घेतला. यानंतर पादचारी पुलांचे निर्मितीकार्य वेगाने पूर्ण करण्यात आले. सध्या ३ पादचारी पुलांचे लोकार्पण करण्यात आले. मार्च महिन्यात ८ पादचारी पूल आणि जून महिन्यात २ असे एकूण १३ पादचारी पूल प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी दिली.अनेक वर्षांपासून मुंबई सेंट्रल स्थानकाला नानाशंकर शेठ नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप ही मागणी पूर्ण करण्यात आली नाही. रेल्वे प्रशासनाला नाना शंकरशेठ यांच्या कर्तृत्वाचा विसर पडल्याची नाराजी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी या वेळी व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांपासून ठाकुर्ली टर्मिनसचे काम सुरू आहे. मात्र हे काम वेगाने पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले....तर परिणाम भोगावे लागतीलज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे टर्मिनस ओळखले जाते तेथे शिवाजी महाराजांचा पुतळा नाही, ही शोकांतिका आहे. छत्रपतींचा पुतळा सीएसएमटीला दर्शनी भागात अर्थात गार्डनमधील वर्तुळात बसवण्यात यावा, ही आमची मागणी आहे. ती पूर्ण न झाल्यास रेल्वेला परिणाम भोगावे लागतील.- खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेतेलवकरच महाराजांचा पुतळा उभारणारछत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. पुतळ्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी निधीदेखील राखीव ठेवण्यात आला आहे. लवकरच टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८जवळ शिवरायांचा पुतळा बसवण्यात येईल.- डी. के. शर्मा, महाव्यवस्थापक, रेल्वे

टॅग्स :मुंबई लोकल