२०१९-२० मधील नववीच्या विद्यार्थ्यांनी अनुत्तीर्ण झाल्याने स्वीकारला दहावी अर्ज न भरण्याचा पर्याय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई जिल्ह्यातील जवळपास १३ हजार ५५३ विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची माहिती नसल्याने आणि ते नववीमध्ये नापास झाल्याने यंदाच्या दहावीच्या परीक्षांना अर्ज नोंदणी न करू शकल्याची माहिती समोर आली आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात मुंबई जिल्ह्यात नववीमध्ये शिकणाऱ्या एकूण १ लाख ७५ हजार २५३ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ६१ हजार ७०० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन दहावीच्या परीक्षेसाठी पात्र ठरले. नववीतील तब्बल ५ हजार ६७८ विद्यार्थी २०१९-२० या वर्षात अनुत्तीर्ण झाले तर ७ हजार ८७५ विद्यार्थ्यांची माहितीच नसल्याने शाळांनी त्यांचा निकाल नसल्याची माहिती राज्य शिक्षण विभागाला दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एकूणच मुंबई जिल्ह्यात २०१९-२० मध्ये नववीत शिकत असणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ११.५३ टक्के विद्यार्थ्यांची दहावीत येताना गळती झाल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे हे विद्यार्थी गेले कुठे, असा सवाल पुढे येत आहे. कोरोनामुळे यंदा शाळा नियमित होऊ शकल्या नाहीत आणि शिक्षणाचे संपूर्ण सत्र खोळंबल्याने अनेक विद्यार्थ्यांनी ड्रॉप घेतल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मुंबई विभागीय मंडळाकडे एप्रिल २०२१ च्या परीक्षेसाठी झालेल्या नोंदणीवरून लक्षात येते की, दहावी - बारावीचे वर्ष महत्त्वाचे वाटत असल्या कारणाने अनेक विद्यार्थ्यांनी यंदा ड्रॉप घेण्याची मानसिकता दाखवली. यंदाच्या संपूर्ण शैक्षणिक वर्षात शाळा, शिकवणी वर्ग बंद असल्याने, अभ्यासाचे वातावरण विद्यार्थ्यांना यंदा मिळाले नाही. शहरातील काही शाळांनी ऑनलाइनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण केले; पण ऑनलाइनद्वारे विद्यार्थ्यांचा अपेक्षित अभ्यास झाला नाही, त्यामुळे अनेकांनी ड्रॉप घेण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नववीतून दहावीत येताना गळती झालेल्या विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी करावी व शाळांनी त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला भेट द्यावी. त्यातील केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी, डाएट व गटसाधन केंद्रातील साधनव्यक्ती यांनी काही टक्के भेटी करून खातरजमा करावी व त्याचा अहवाल शासनाकडे सादर करावा, अशी मागणी सिस्कॉम या संघटनेने केली आहे. या सामाजिक अभ्यासातून बालविवाह किती झाले, किती विद्यार्थी बाल मजुरी करतात, किती विद्यार्थ्यांच्या पालकांचे स्थलांतर झाले, आर्थिक वास्तवामुळे मुला-मुलींनी शाळा सोडली का, असे अनेक तपशील उपलब्ध होतील. त्यातून पहिली ते आठवी याकाळात जी मुले शाळा सोडतात, त्यांचा शोध कसा घ्यावा, याचीही पद्धत लक्षात येईल, अशी प्रतिक्रिया काही सामाजिक कार्यकत्यांनी दिली.
कोट
आरटीई कायद्यानुसार आठव्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना नापास करता येत नाही; पण नवव्या वर्गात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर लक्षात घेता, शाळा निकाल खालवू नये म्हणून विद्यार्थ्यांना नापास करतात, हे त्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. दुसरे असे की, कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. स्थलांतराचाही परिणाम झाल्याने ड्रॉपर्स वाढले. मुलींची संख्या कमी होण्यात बालविवाहासारख्या प्रथा नाकारता येणार नाहीत. कारण लॉकडाऊनच्या काळात महिला व बालकल्याण विभागाने मोठ्या प्रमाणात बालविवाह रोखले आहेत. त्यामुळे ही कारणेही तेवढीच महत्त्वाची आहेत.
- वैशाली बाफना, शिक्षण अभ्यासक
------------------------------------------------------
चौकट
विद्यार्थीसंख्या - उत्तीर्ण - अनुत्तीर्ण - गुण संकलित नाही -
पालिका - १८४२४-१५८४९-१२१५-१३६०
डिव्हायडी -१,५६,८२९- १४५८५१-४४६३-६५१५
एकूण - १७५२५३-१६१७००-५६७८-७८७५