Join us

१३ हजार आगी, ६५ मृत्यू तर ४७३ जखमी; मुंबईकरांना आगीचे जीवघेणे चटके 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 9:38 AM

गेल्या तीन वर्षांत आगीच्या १३ हजार घटनांनी मुंबईकरांना आगीचे चटके बसल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई : अग्निसुरक्षेच्या बाबतीत मुंबईकरांची बेफिकिरी काही कमी झाल्याचे दिसत नाही. निकृष्ट दर्जाची वायरिंग, शॉर्टसर्किट, जिन्यात टाकाऊ सामानांची गर्दी, इमारतीत अग्निशमन यंत्रणेचा अभाव, बेकायदा सिलिंडरचा साठा अशा अनेक कारणांमुळे मुंबईत आगीच्या घटना घडत आहेत. गेल्या तीन वर्षांत आगीच्या १३ हजार घटनांनी मुंबईकरांना आगीचे चटके बसल्याचे पाहायला मिळाले. आधीच्या काही वर्षाच्या तुलनेत २०२३ साली आगीच्या घटनांमध्ये सात टक्के वाढ झाली होती. या आगीच्या घटनांमध्ये ६५ जणांना जीव गमवावा लागला. 

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात गोरेगाव येथील जयभवानी या ‘एसआरए’ योजनेतील इमारतीला पहाटे लागलेल्या भीषण आगीनंतर पुन्हा एकदा अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर विशेष करून ‘एसआरए’ योजनेतील इमारतींसाठी अग्निसुरक्षा   निकष आणखी कडक करण्यात आले. मात्र, त्याहीनंतर डिसेंबर अखेरपर्यंत मुंबईत १७ ठिकाणी आगी लागून चार जण मरण पावले होते. तर ३२ जण जखमी  झाले होते. 

आगीची कारणे कोणती?

 ८० टक्के आगी या शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे स्पष्ट झाले आहे. निकृष्ट दर्जाची वायरिंग, इमारतींच्या मोकळ्या जागा, जिने इमारतीची गच्ची या ठिकाणी रहिवासी टाकाऊ सामान आणून टाकतात.

 त्यात जुन्या फर्निचरचे प्रमाण जास्त असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. गोरेगाव येथील जय भवानी इमारतीच्या पार्किंग जागेत चिंध्यांची मोठी गाठोडी  ठेवण्यात आली होती. ही  गाठोडी आगीचे मुख्य कारण बनली होती.  

 उंच इमारतींचे आव्हान :

अलीकडच्या काळात मुंबईत उत्तुंग टॉवर  उभे राहिले आहेत. टॉवरमध्ये आग लागल्यास ती विझवणे हे मोठे आव्हान असते. काही टॉवरमध्ये अग्निशमन यंत्रणा अस्तित्वात होती, मात्र ती कार्यक्षम नव्हती, असेही काही घटनांमध्ये  अग्निशमन दलाला आढळून आले होते. अलीकडच्या काळात बहुसंख्य टॉवरमध्ये ही यंत्रणा कार्यक्षम करण्यात  आल्याचे दिसते, असे निरीक्षण अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नोंदवले. 

नवीन फायर  स्टेशन :

अग्निशमन दलाच्या ताफ्यात ४८३ चालक, ३०० अधिकारी व कर्मचारी आहेत. मुंबईत ३४ मोठे व १९ लहान फायर स्टेशन्स आहेत. येत्या काळात पाच मोठी, एक लहान फायर स्टेशन उभारले जाणार आहे. 

दिवाळीत प्रमाण जास्त :

२०२१ च्या तुलनेत २०२३ मध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २०२३ या वर्षात चार हजार ७२१ आगीच्या घटना घडल्या. त्यात ३३ जण मरण पावले तर, २९० जण जखमी झाले होते. २०२३ सालच्या दिवाळीत म्हणजे नोव्हेंबर महिन्यात लहान-मोठ्या अशा ६५५ आगी  लागल्या होत्या. दिवाळीत आगी लागण्याचे प्रमाण तुलनेने जास्तच असते.  

टॅग्स :मुंबईआग