अवैध मद्यविक्री करणाऱ्या १३ हजार जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 05:54 AM2018-10-26T05:54:19+5:302018-10-26T05:54:29+5:30
अवैध मद्यविक्री व अवैध मद्य उत्पादन रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कडक पावले उचलली आहेत.
- खलील गिरकर
मुंबई : अवैध मद्यविक्री व अवैध मद्य उत्पादन रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कडक पावले उचलली आहेत. विभागाच्या भरारी पथकाने धडक कारवाई करत ६ महिन्यांत २० हजार गुन्हे दाखल केले असून, १३ हजार जणांना अटक केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भरारी पथकाने ही कामगिरी केली आहे.
भरारी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये राज्यभरात विविध ठिकाणी छापे मारून १९ हजार ९०० गुन्हे दाखल केले असून, १३ हजार १५० जणांना अटक केली आहे. या वेळी अवैध उत्पादन व विक्री केल्या जाणाºया विदेशी मद्य, देशी मद्य, वाइन, बीअर, गुन्ह्यात वापरण्यात आलेली व जप्त करण्यात आलेली वाहने अशा प्रकारे सुमारे ४५ कोटी रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. २०१७-१८ या वर्षभराच्या कालावधीत विभागाने ४५ हजार गुन्हे नोंदवून २६ हजार जणांना अटक केली होती व ९० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.
>येथे करा तक्रार
अवैध मद्यविक्री व उत्पादनाची तक्रार करण्यासाठी १८००८३३३३३३ हा टोल फ्री क्रमांक व ८४२२००११३३ हा व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू आहे. यावर केलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात येते व तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवण्यात येते, अशी माहिती अधिकाºयांनी दिली. २ आॅक्टोबर २०१६ ला टोल फ्री क्रमांक कार्यान्वित झाल्यापासून ५ हजार ४६० तक्रारी आल्या असून, त्यापैकी ९५ टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. याशिवाय आॅफलाइन माध्यमातून देखील स्थानिक पातळीवर तक्रार करण्याची सुविधा आहे. २०१७-१८ मध्ये राज्यभरात ३२ कोटी लीटर देशी मद्यविक्री झाली, विदेशी मद्यविक्रीचे प्रमाण १९ कोटी व बीअर विक्रीचे प्रमाण ३२ कोटी लीटर होते. विभागाला १९ हजार ५०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.