मुंबई, दि. 11 : मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चारकोप परिसरातील 13 वर्षाच्या मुलीला पालक वजन वाढलं या कारणाने रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांच्या निदानामुळे पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण 13 वर्षाची आपली मुलगी 27 आठवड्यांची( साडेसहा) गरोदर असल्याची धक्कादायक माहिती डॉक्टरांनी दिली. पालकांनी बाललैंगिक अत्याचारविरोधी प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
दरम्यान, 13 वर्षाच्या मुलीच्या पालकांनी गर्भपातासाठी परवानगी द्यावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भारतात 20 आठवडय़ांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी असल्याने आतापर्यंत मुंबईतील 9 गर्भवतीनीं सर्वोच्च न्यायालयात गर्भपाताच्या परवानगीसाठी धाव घेतली. यापैकी सात महिलांनाच गर्भपाताची परवानगी देण्यात आली असून इतर दोन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातास नकार दिला होता.
बुधवारी त्या मुलीच्या पालकांनी तपासणीसाठी तिला रुग्णालयात नेलं. थायरॉईडमुळे मुलीचं वजन वाढत असल्याचा संशय पालकांना होता. डॉक्टरांनी त्यांना मुलीची सोनोग्राफी करायला सांगितली. सोनोग्राफी रिपोर्टमध्ये मुलगी साडेसहा महिन्यांची प्रेग्नंट असल्याचं समजलं. मुलीला याबाबत काहीच कल्पना नसल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसात तक्रार केल्यावर अज्ञाताविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरवर्षी 15 वर्षांखालील 200 हून अधिक मुलींचे गर्भपात केले जातात. मात्र गर्भ 20 आठवड्यांच्या आतील असेल तरच गर्भपाताला परवानगी आहे. परंतु पीडित मुलगी ही 27 आठवडयांची प्रेग्नंट असल्यानं तिच्या जीवाला धोका निर्माण होईल, असं डॉक्टरांनी सांगितलं.