मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून डायलिसिसवर असणाऱ्या ऐरोली येथील आर्या पाटील या अवघ्या १३ वर्षांच्या मुलीवर किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रीया करण्यात आली. विशेष म्हणजे, या मुलीला मेंदूमृत अवयवदात्याकडून ही (कॅडेव्हरिक) किडनी मिळाली आहे. लहान मुलांना मेंदूमृत अवयवदात्याकडून किडनी मिळणे दुर्मीळ घटना आहे. दरम्यान, तीन वर्ष डायलिसिसवर असणाऱ्या या मुलीची त्यातून सुटका झाली आहे.
आर्याचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे चार वर्षांपूर्वी समजले. या मुलीला अल्पोर्ट सिंड्रोम हा एक दुर्मीळ आनुवंशिक आजार होतो, ज्याचा किडनीवर परिणाम तर होतोच त्यासोबत श्रवणदोष होऊ शकतो. नऊ महिन्यांची असताना श्रवणशक्ती कमी झाल्याने १८ महिन्यात कॉक्लियर इम्प्लांट करावे लागले. ज्यावेळी ती आठ वर्षांची झाली. त्यावेळी त्या मुलीची किडनी निकामी झाल्याचे निदान वाडीयाच्या डॉक्टरांनी केले.
वाडिया रुग्णालयातील ही पहिली कॅडेव्हरिक किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. ब्रेनडेड मुलाच्या अवयवदानामुळे एका मुलीला नवीन आयुष्य मिळाले आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. मुलाला अपघातात गमावल्यानंतरही त्याचे अवयवदान करून इतर मुलांचे प्राण वाचविल्याबद्दल आम्ही मुलाच्या पालकांचे आभार मानू इच्छितो.
- डॉ. मिनी बोधनवाला, सीईओ, वाडिया हॉस्पिटल