थकलेल्या भाऊच्या धक्क्याला लागणार १,३०० बोटी; महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने हाती घेतला प्रकल्प

By जयंत होवाळ | Published: November 2, 2023 12:58 PM2023-11-02T12:58:34+5:302023-11-02T12:59:15+5:30

मुंबईचा इतिहास जपणाऱ्या भाऊच्या धक्क्याचे नुतनीकरण करण्याचा मुहूर्त निघाला असून, काम पूर्ण होताच या ठिकाणी १,३०० बोटी एकावेळी लागू शकतील.

1300 boats required for a bhaucha dhakka The project was taken up by the Maharashtra Maritime Board | थकलेल्या भाऊच्या धक्क्याला लागणार १,३०० बोटी; महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने हाती घेतला प्रकल्प

थकलेल्या भाऊच्या धक्क्याला लागणार १,३०० बोटी; महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने हाती घेतला प्रकल्प

मुंबई :  

मुंबईचा इतिहास जपणाऱ्या भाऊच्या धक्क्याचे नुतनीकरण करण्याचा मुहूर्त निघाला असून, काम पूर्ण होताच या ठिकाणी १,३०० बोटी एकावेळी लागू शकतील. पूर्वी या धक्क्यावर ३०० बोटी नांगर टाकू शकतील, असे स्वरूप होते. रोज ५० ते ८० बोटींची दिवसभरात येजा होत होती. 
धक्क्याची क्षमता वाढवण्याचा प्रकल्प महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने  हाती घेतला आहे. तो पूर्ण होताच १,३०० बोटी येथे लागतील.  

भाऊचा धक्का थकला आहे...
भाऊचा धक्का हे मुंबईचे एक मुख्य आकर्षण. मासेमारी करणाऱ्या बोटी, होलसेल मासळी खरेदीदारांची लगबग, मासे खरेदी-विक्रीची धांदल पाहायला उत्सुकतेने भल्या पहाटे आलेले मुंबईकर... भाऊच्या धक्क्यावर नेहमी नजरेस पडणारे हे दृश्य ! असा हा भाऊचा धक्का आता खूप जुना झाला आहे. अनेक वर्षे समुद्राच्या लाटा सहन करून तो आता थकला आहे. या भाऊच्या धक्क्याला लवकरच नवी उभारी मिळणार आहे, तो नव्या रुपात उभा राहणार आहे. 

...असे पडले नाव 
लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य यांनी सागरी मालवाहतुकीसाठी हा धक्का  बांधला. ते अत्यंत मोठ्या मनाचे आणि क्षमाशील प्रवृत्तीचे होते. त्यामुळे सगळे त्यांना आदराने भाऊ म्हणत. साहजिकच त्यांनी बांधलेला धक्का हा ‘भाऊ’चा धक्का म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यापूर्वी सागरी  मालाच्या वाहतुकीसाठी अशी व्यवस्था नव्हती. हा धक्का बांधल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बोटींची ये-जा सुरू झाली.  १९७९ साली येथे जेटी बांधण्यात आली. 

...अशी असेल सुधारित जेटी 
>> जेटीला समांतर रस्ता असेल. त्यामुळे ट्रक थेट बोटींच्या जवळ जाऊ शकतील. परिणामी मालाची ने-आण करणे सोपे जाईल. 
>> सध्या कामगार हाताने बोटीतून माल  उतरवून घेतात आणि ट्रकमध्ये भरतात. त्यात खूप  वेळ जातो.  
>> यापुढे बोटीतून माल थेट ट्रकमध्ये चढवला जाईल. प्रवासी बोटी आणि मासेमारी करणाऱ्या बोटींच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग असेल.

कारभार वाढला 
यथावकाश येथील कारभार विस्तारला, मासे विक्री - खरेदीच्या दृष्टीने भाऊच्या धक्क्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आणि साहजिकच जागा कमी पडू लागली. दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले असून, त्यासाठी १०२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Web Title: 1300 boats required for a bhaucha dhakka The project was taken up by the Maharashtra Maritime Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई