Join us

1,300 कोटींचा खर्च, पण ‘मिठी’ कुरूपच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 11:50 AM

प्रवाह वेगवान मात्र, पुरापासून संरक्षणात अपयश, ‘गोड’ होण्यासाठी १७ वर्षांपासून प्रतीक्षा 

- सचिन लुंगसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतून वाहणाऱ्या मिठी नदीचे खोलीकरण, रुंदीकरण आणि सौंदर्यीकरणासाठी महापालिका आणि ‘एमएमआरडीए’ने घाट घातला असला, तरी गेल्या १७ वर्षांपासून मिठी नदी ‘गोड’  होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. कारण १३०० कोटी खर्च करूनही ‘मिठी’चे सौंदर्यीकरण पूर्ण झालेले नाही.

याव्यतिरिक्त आणखी १ हजार कोटी विविध कामांसाठी खर्च केले जाणार आहेत. या दोन्ही प्राधिकरणांनी ‘मिठी’साठी बहुतांश कामे केली असली, तरी प्रत्यक्षात मात्र प्रदूषणापासून आजही ‘मिठी’ला मुक्ती मिळालेली नाही. आणि दुसरीकडे पाण्याचा प्रवाह वेगवान करण्यात दोन्ही प्राधिकरणांना यश आले असले, तरी ‘मिठी’मुळे येणाऱ्या पुरापासून मुंबईकरांचे संरक्षण करण्यात प्राधिकरण अपयशीच ठरली आहे.

गॅरेज आणि भंगारवालेमिठी नदीला अनेक नाले येऊन मिळतात. शिवाय नदीकाठी प्रदूषण करणारे उद्योग आहेत. गॅरेज आणि भंगारवाल्यांनी तर कहर केला आहे. यातले रासायनिक घटक  मिठीत मिसळले जात असल्याने जलप्रदूषणाचा प्रश्न निकाली निघत नाही.

स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज लाइन, सिव्हरेज बांधले नाही. दोन वर्षांपूर्वी तक्रार केल्यानंतर आता कुठे याचे काम हाती घेतले जाईल. हे काम आधीच्या प्रकल्पात घेतले नाही. सर्वात महत्त्वाचे कामाचे ऑडिट झालेले नाही. केंद्र या कामावर समाधानी नाही. त्यामुळे केंद्राचा निधी मिळालेला नाही. महापालिका आणि एमएमआरडीएने नियोजन केले नाही. त्यामुळे मिठीचा बकालपणा गेला नाही.- अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ते

मुख्यमंत्र्यांनी नालेसफाई किंवा मिठी नदीच्या कामाची पाहणी करणे म्हणजे महापालिका किंवा इतर प्राधिकरणाने काम नीट करत नाही, असा त्याचा अर्थ होतो. पालिकेने केवळ पावसाळ्यापुरते सफाईकडे पाहू नये. बारामाही काम सुरू असावे.- ॲड. गॉडफ्रे पिमेंटा, संस्थापक, वॉचडॉग फाउंडेशन

मिठी तुंबल्याने कुर्ला, कलिना, सांताक्रूझमधील बहुतांश परिसर पाण्याखाली जातो. एलबीएस पाण्याखाली जातो. मिठी साफ करण्यापूर्वी मिठीला जोडणारे मोठे आणि छोटे नाले साफ करा. मग किंचित दिलासा मिळेल.- राकेश पाटील, कुर्ला

महाप्रलय आणि १३०० कोटीसाफसफाई आणि अन्य कामांसाठी ‘मिठी’वर १३०० कोटी खर्च केले आहेत. २००५ मध्ये आलेल्या महाप्रलयानंतर ही कामे सुरू झाली असली, तरी १७ वर्षांनीही कामे पूर्ण झालेली नाहीत.

झोपड्यांचे प्रदूषणमिठी किनारी १५०० औद्योगिक घटक आहेत. शिवाय झोपड्या आहेत. यातील सगळे रासायिक घटक नदीमध्ये सोडले जातात. त्यामुळे प्रदूषणात भर पडते. 

पुनर्वसनाला विलंबकुर्ला पश्चिमेकडील मिठी नदीजवळ वसलेले क्रांतीनगर दरवर्षी मिठीच्या पुरात जाते. केवळ हाच परिसर नाही तर वाकोल्यातही हीच स्थिती असते. क्रांतीनगरमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत विलंब होत असल्याने त्यांना आजही पुरात रात्र काढावी लागते.

टॅग्स :नदी