मुंबई : डॉक्टरांची रिक्त पदे, रिक्त पदांवर तात्पुरते डॉक्टर, वेतनवाढ नाही की सुविधाही मिळत नाही अशा स्थितीतही डॉक्टर कोरोना काळात रुग्ण सेवा बजावत आहेत. मात्र यावर काहीच उपाययोजना होत नसल्याने डॉक्टरांमध्ये संतापाची भावना आहे. प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील १३०० डॉक्टर संपावर गेले आहेत. सामाजिक अंतर राखत जे. जे. रुग्णालयासह राज्यातील अन्य रुग्णालयांतही डॉक्टरांनी आंदोलन सुरू केले.राज्यातील १८ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सात हजार शिक्षकांची गरज असताना निव्वळ ३ हजार १०० शिक्षक आहेत. म्हणजेच ५० टक्के पदे रिक्त असल्याचे महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. सचिन मुलकुटकर यांनी सांगितले. मागील पाच वर्षांपासून या रिक्त पदांवर सुमारे ६५० डॉक्टर तात्पुरते काम करीत असून त्यांना ना वेतनवाढ किंवा अन्य सुविधाही मिळत नाहीत. त्यांना कायम करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. कायम शिक्षक व डॉक्टरांना दीड लाख रुपये वेतन मिळते. सातव्या वेतनाची अंमलबजावणी न केल्याने तात्पुरते शिक्षक आणि डॉक्टरांना ६५ ते ७० हजार रुपये मानधन दिले जाते.केरळमध्ये डॉक्टरांना १० टक्के जोखीम भत्ता देण्यात येतो, मात्र महाराष्ट्र सरकार का देत नाही, असा सवाल या वेळी उपस्थित करण्यात आला.
प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील १३०० डॉक्टर संपावर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2020 1:42 AM