मरिन ड्राइव्हवर महापालिकेने बसविले १३ हजार टेट्रापॉडस; पुढील १०० वर्ष टिकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 09:26 AM2024-11-29T09:26:15+5:302024-11-29T09:26:48+5:30
प्रशासनाकडून ८२ टक्के काम झाले पूर्ण, कोस्टल रोड प्रकल्पाअंतर्गत दुसरा बोगदा १० जूनला खुला करण्यात आला. या परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा पुरवण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत
मुंबई - शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या कामासाठी मरिन ड्राइव्ह येथील समुद्र किनाऱ्यावरील टेट्रापॉडस काढण्यात आले होते. मात्र, या परिसरातील काम पूर्ण झाल्याने आता संपूर्ण किनारपट्टीवर जी. डी. सोमाणी चौकापासून बालभवनपर्यंतच्या १.४ किलोमीटरच्या भागात नव्याने १३ हजार टेट्रापॉड बसविण्यात येत आहेत. सध्या त्याचे १.२ किलोमीटरदरम्यानचे (८२ टक्के) काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, नवीन टेट्रापॉडस १०० वर्षे टिकणारे असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
कोस्टल रोड प्रकल्पाअंतर्गत दुसरा बोगदा १० जूनला खुला करण्यात आला. या परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा पुरवण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. सोबतच सुरक्षिततेच्या बाबतीत ही काळजी घेतली जात आहे. त्यामुळे पालिकेच्या वतीने कोस्टल रोड प्रकल्पाअंतर्गत प्रिन्सेस स्ट्रिट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्क या टप्प्यावर मरिन ड्राइव्ह येथील समुद्र किनाऱ्यालगतचे जुने टेट्रापॉड जीर्ण झाल्यामुळे तेथे नवीन टेट्रापॉड बसविण्याच्या सूचना करण्यात आली. मरिन ड्राइव्ह येथील टेट्रापॉड हे १९६० ते १९६५ या कालावधीत ठेवण्यात आले होते, तर त्यातील काही टेट्रापॉड १९९८ ते २००२ दरम्यान बदलण्यात आले होते. दरम्यान, हे टेट्रापॉड जुने झाल्याने ते बदलण्यात येत आहेत.
एकाचे वजन तब्बल अडीच टन
कोस्टल रोडच्या पदपथाशेजारी समुद्राच्या सुरक्षा भिंतीची उभारणी बीम आणि कॉलमचा वापर करून करण्यात आली आहे. सुरक्षा भिंत आणि तिथे येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन असे टेट्रापॉड पुन्हा बसवणे योग्य नसल्यामुळे नवीन टेट्रापॉडस बसविण्यात येणार आहेत. नवीन टेट्रापॉड हे हायग्रिड काँक्रीटचे बनविण्यात आले असून, एका टेट्रापॉडचे वजन जवळपास दोन ते अडीच टन आहे.हे टेट्रापॉड १०० वर्षे टिकू शकणारे असून, ब्रीच कँडी रुग्णालयाजवळ असणाऱ्या कारखान्यात ते बनविले जात आहेत. नंतर ते मरिन ड्राइव्हपर्यंत आणले जातात. या कामाची सर्व जबाबदारी ही पालिकेने कोस्टल रोडचे काम करत असलेल्या एल ॲण्ड टी कंपनीवर सोपविली आहे.
उपयोग काय?
समुद्र किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी तेथे सिमेंटच्या टेट्रापॉडचा वापर केला जातो. पालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, टेट्रापॉड ठेवण्याची पद्धत इंटरलॉकिंग असते. त्यामुळे ते उचलून दुसऱ्या ठिकाणी नेताना तुटण्याचे प्रमाण अधिक असते. मागच्या काही काळात टेट्रापॉडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. यामधील बहुतेक टेट्रापॉड जुने झाले आहेत, तर काहींचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे.