तीन महिन्यांत १३१ कोटींच्या वीजचोऱ्या उघडकीस

By सचिन लुंगसे | Published: August 10, 2022 08:12 PM2022-08-10T20:12:32+5:302022-08-10T20:13:00+5:30

Electricity: वीजचोरीमुळे नियमित वीजबिल भरणाऱ्या प्रामाणिक वीज ग्राहकांवर वीजदर वाढीचा बोजा पडतो. अशा प्रामाणिक व नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचे हित जपणे गरजेचे आहे त्यामुळे महावितरणने वीजचोरी करणाऱ्यांविरोधात कारवाईची बडगा उगारला आहे.

131 crore electricity theft revealed in three months | तीन महिन्यांत १३१ कोटींच्या वीजचोऱ्या उघडकीस

तीन महिन्यांत १३१ कोटींच्या वीजचोऱ्या उघडकीस

googlenewsNext

मुंबई -  वीजचोरीमुळे नियमित वीजबिल भरणाऱ्या प्रामाणिक वीज ग्राहकांवर वीजदर वाढीचा बोजा पडतो. अशा प्रामाणिक व नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचे हित जपणे गरजेचे आहे त्यामुळे महावितरणने वीजचोरी करणाऱ्यांविरोधात कारवाईची बडगा उगारला आहे. त्यानुसार महावितरणच्या भरारी पथकांनी एप्रिल ते जून-२०२२ या तीन महिन्याच्या काळात वीजचोरीची तब्बल १३१ कोटी ५० लाखांच्या २ हजार ६२५ प्रकरणे उघडकीस आणली आहेत. वीजचोरी व विजेचा गैरवापर आणि इतर अनियमिता आटोक्यात आणण्यासाठी तसेच वीजचोरांविरूध्द अतिजलद कारवाई करण्यासाठी विभागीय स्तरावर आणखी दहा नवीन भरारी पथकांची स्थापना करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत.

विजय सिंघल यांनी नुकतीच सुरक्षा व अंमलबजावणी विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी बोलतांना सिंघल म्हणाले की, महावितरणची आर्थिक घडी सुधारण्यासाठी सर्वकष प्रयत्न करण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून वीजचोरी करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे भरारी पथकांनी अधिक सक्षमपणे काम करून वीजचोरीस लगाम घालावा, असे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीस सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक (प्रभारी) कमांडर (सेवानिवृत्त) शिवाजी इंदलकर यांच्यासह सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सध्या महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी  विभागात ६३ भरारी पथकांसह आठ अंमलबजावणी युनिटस कार्यरत आहेत. या भरारी पथकांनी चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल, मे आणि जून या प्रथम तिमाहीत वीजचोरीची २३९.५८ दशलक्ष युनिटच्या वीजचोरीची तब्बल २ हजार ६२५ प्रकरणे उघडकीस आणून वीजचोरांकडून सुमारे ५४ कोटी १६ लाख ६६ हजारांचा दंड वसूल केला आहे. उर्वरित बिलांची रक्कमही लवकरात लवकर संबंधितांकडून वसूल करण्यात यावी, असेही निर्देश विजय सिंघल यांनी  दिले.

कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत-२२, पुणे प्रादेशिक कार्यालय-१४, नागपूर प्रादेशिक कार्यालय- १५ तर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयालयात - १२ भरारी पथके कार्यरत आहेत. त्यात नोव्हेंबर-२०२१ पासून विभागीय कार्यालय स्तरावर सुरू करण्यात आलेल्या २० भरारी पथकांचा समावेश आहे. प्रत्येक भरारी पथकाने दर महिन्याला वीजचोरीची जवळपास २० प्रकरणे उघडकीस आणली आहेत.

मागिल तीन आर्थिक वर्षात महावितरणच्या भरारी पथकांनी वीजचोरांवर अंकूश लावण्यात यश मिळविले असून २०१९-२० या आर्थिक वर्षात ९२५० प्रकरणांत ९७.५० कोटींची वीजचोरी उघडकीस आणली.  तर २०२०-२१ या आर्थिक वर्षात कोरोना महामारीत शासनाच्या विविध निर्बंधामुळे वीजचोरांविरूध्द कारवाया करण्यावर मर्यादा आल्या असल्या तरी ७१६९ एवढ्या मोठ्या संख्येने वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणली. यात ८७.४९ कोटींची वीजचोरी पकडण्यात आली. तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात वीजचोरीची तब्बल १३ हजार ३७० प्रकरणे उघडकीस आणण्यात भरारी पथकांना यश आले. त्यात वीजचोरीची रक्कम २६४.४६ कोटी एवढी आहे.

सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने वीजहानी कमी करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. वीजचोरीच्या एकूण अनुमानित रक्कमेपैकी २०१९-२० या आर्थिक वर्षात ५४.३६ कोटी, २०२०-२१ या वर्षात ५३.१८ कोटी तर २०२१-२२ या वर्षात १२४.९८ कोटी रुपयांची अनुमानित रक्कमेची वीजबिले वीजचोरांकडून वसूल करण्यात आली. वीजचोरी करणे, विजेचा गैरवापर करणे किंवा अनधिकृतपणे विजेचा वापर करणे हा भारतीय विद्युत कायद्यानुसार दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे ग्राहकांनी प्रामाणिकपणे विजेचा वापर करून कोणत्याही प्रकारे विजेची चोरी करू नये, असेही आवाहन विजय सिंघल यांनी केले आहे.

Web Title: 131 crore electricity theft revealed in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.