राज्यात १,३२४ अपघात प्रवण क्षेत्रे; अपघात रोखण्यासाठी उपाययोजना सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 04:22 AM2019-12-09T04:22:49+5:302019-12-09T06:03:16+5:30
मागील सलग तीन वर्षांत ५०० मीटर क्षेत्रामध्ये एकूण पाच प्राणांतिक अपघात किंवा गंभीर अपघात अथवा एक किंवा एकापेक्षा जास्त अपघात झाले असतील
मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. या अपघातांना आळा घालण्यासाठी अपघात प्रवण क्षेत्रे शोधण्यात आली असून, राज्यात एकूण १,३२४ अपघात प्रवण क्षेत्रे आहेत. या अपघात प्रवण क्षेत्रांवर उपाययोजना सुरू असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली.
मागील सलग तीन वर्षांत ५०० मीटर क्षेत्रामध्ये एकूण पाच प्राणांतिक अपघात किंवा गंभीर अपघात अथवा एक किंवा एकापेक्षा जास्त अपघात झाले असतील, त्या अपघात प्रवण क्षेत्रांना ‘ब्लॅक स्पॉट’ असेही संबोधले जाते. राज्यातील वाढते अपघात रोखण्यासाठी या अपघात प्रवण क्षेत्रांची माहिती परिवहन विभागाकडून घेण्यात येत आहे.
याबाबत परिवहन विभागाचे सहआयुक्त जे. बी. पाटील म्हणाले की, अपघात प्रवण क्षेत्रांवर अपघात होण्याची कारणे शोधण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये रस्त्यावर पट्टे आहेत का, इतर कोणती कमतरता आहे, पादचाऱ्यांचे अपघात भरधाव वेगामुळे होत आहेत का, असे काही निकष आहेत. रस्त्याची रचना, वाहन चालक, पदपथ पूरक आहेत का, हे पहिले जाते. त्या अनुषंगाने कारवाई केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ज्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीमार्फत अपघात प्रवण क्षेत्रांबाबत अभ्यास सुरू आहे. या समितीत बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, नगरविकास विभाग, महापालिका, नगरपरिषदेच्या अधिकाºयांचा समावेश आहे.
आढावा घेतल्यानंतर कार्यवाही!
अपघात टाळण्यासाठी अपघात प्रवण क्षेत्रांवर उपाययोजना सुरू आहेत. यात काही ठिकाणी दिशादर्शक फलक, झेब्रा क्रॉसिंग यासारख्या तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात, तर काही ठिकाणी उड्डाणपूल किंवा रस्त्यात बदल अशा कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहेत. त्याबाबतची माहिती जिल्हा रस्ते सुरक्षा समितीला देण्यात आली आहे. त्याचा आढावा घेण्यात येत असून, आतापर्यंत तात्पुरत्या उपाययोजना ज्या आहेत, त्या सर्व करण्यात आल्या असून कायमस्वरूपी उपाययोजनांबाबत कार्यवाही सुरू आहे, असे जे. बी. पाटील म्हणाले.