डिप्पी वांकाणी , मुंबई मुंबई पोलीस दलात उपनिरीक्षकापासून सहायक आयुक्तापर्यंतच्या तब्बल १३२९ जागा रिक्त असून, त्या नजीकच्या काळात भरल्या जाण्याची चिन्हे नाहीत. कायदा-सुव्यवस्थेची स्थिती डोळ्यांपुढे ठेवून मुंबईच्या पोलीस दलातील रिक्त जागांचा आढावा नुकताच घेण्यात आला. विशेषत: खास कौशल्ये असलेल्या जागा आणि साईड ब्रँचेसचा विचार करता ही रिक्त जागांची संख्या काळजी करायला लावणारी आहे, असे वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.महाराष्ट्र दहशतवादविरोधी तुकडीला संपूर्ण राज्यात केवळ सहायक पोलीस आयुक्त असल्याचे गेल्या महिन्यात ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. हे सहायक पोलीस आयुक्ताचे पद दहशतवाद प्रकरणाच्या हाताळणीतील सुकाणू अधिकारी संवर्गातील आहे.वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकट्या मुंबईत उपनिरीक्षकांची ९१५, सहायक निरीक्षकांची २३०, निरीक्षकांची १२८ आणि सहायक आयुक्तांची ५६ पदे रिक्त आहेत. मुंबईतील ९३ पोलीस ठाण्यात खूप जागा रिक्त नाहीत. परंतु गुन्हे शाखा, वाहतूक विभाग, समाजसेवा शाखा, समाज कल्याण विभाग, नियंत्रण कक्ष आणि विशेष शाखेत अनेक जागा रिक्त आहेत. एका विभागात जर तीन सहायक पोलीस आयुक्त हवेत, तेथे एक तर नियुक्तीच नाही किंवा केवळ एकच सहायक पोलीस आयुक्त आहे. मग या एकाच अधिकाऱ्यावर न्यायालयात उपस्थित राहणे, माहिती अधिकारातील अर्जांना उत्तरे देणे, वरिष्ठांना अहवाल पाठविणे अशी तिन्ही पदांची कामे येऊन पडतात. शिवाय या जागा ‘शिक्षा’ म्हणून समजल्या जात असल्यामुळे जो अधिकारी धाडसी समजला जातो त्याची नियुक्ती येथे होत नाही, असे हा अधिकारी म्हणाला. मुंबई पोलिसांसाठी गुप्त माहिती गोळा करणाऱ्या विशेष शाखेसारख्या महत्वाच्या शाखेत अनेक पदे रिक्त आहेत.पोलीस उपनिरीक्षकाने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली असली तरी त्यालाही नवी नियुक्ती लवकर मिळण्याची खात्री नाही. पुढील वर्षी आमच्याकडे राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेली तुकडी असेल परंतु ते सगळे केवळ मुंबईसाठी नसतील तर राज्यात त्यांना पाठवावे लागेल. आमची मागणी आम्ही सरकारला कळविली आहे परंतु त्यापैकी केवळ १० टक्क्यांपेक्षा जास्त जागा मंजूर होतील अशी अपेक्षा नाही, असेही हा अधिकारी म्हणाला.
मुंबईत पोलीस अधिकाऱ्यांच्या १३२९ जागा रिक्त
By admin | Published: August 17, 2015 1:42 AM