पनवेलात १३४ गुन्हेगार जेरबंद
By Admin | Published: January 19, 2015 09:49 PM2015-01-19T21:49:02+5:302015-01-19T21:49:02+5:30
पनवेल विभागातील गेल्या वर्षभरातील अनेक गुन्ह्यांची उकल गुन्हे शाखेच्या युनिट -२ने केली आहे.
कामोठे : पनवेल विभागातील गेल्या वर्षभरातील अनेक गुन्ह्यांची उकल गुन्हे शाखेच्या युनिट -२ने केली आहे. या युनिटने १३४ गुन्ह्यांचे प्रगटीकरण करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांच्याकडून कोट्यवधींचा ऐवज हस्तगत केला आहे. याशिवाय सराईत गुन्हेगारांनाही तुरुंगात धाडले आहे.
सिडको वसाहतीत आणि पनवेल व उरण परिसरात सोनसाखळी चोरी, फसवणूक करून लूट त्याचबरोबर घरफोडीच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खारघर, कळंबोली, कामोठे आणि नवीन पनवेलमध्ये चोरांनी धुमाकूळ घातला होता. घर बंद करून बाहेर कामाला गेलेल्या चाकरमान्यांना सायंकाळी परतेपर्यंत घर सुरक्षित राहील की नाही याची खात्री देता येत नव्हती. सोनसाखळी चोरीच्या घटना तर अगदी दररोजच घडत असल्याने चोरांची दहशतच निर्माण झाली आहे. याशिवाय अपहरण, खून, दरोडे , जबरी चोरीच्या घटनांचीही पोलीस ठाण्यात नोंदी झाल्या. मात्र यापैकी अनेक गुन्ह्यांची उकल करण्यास स्थानिक पोलिसांना जमले नाही. मात्र या गुन्ह्यांचा तपास युनिट क्र मांक -२ने करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर जगदाळे, उपनिरीक्षक दादा अवघडे या अधिकाऱ्यांच्या पथकाने खून, दरोडे, चोरी शेकडो गुन्ह्यांची उकल केली असून गुन्हेगारांना जेरबंद केले आहे.
१महाराष्ट्र राज्य बालसंरक्षण आयोगाच्या अध्यक्षा मीनाक्षी संतोष जयस्वाल यांचे मारेकरी आठ तासात पकडून गुन्ह्याची उकल करण्यास या युनिटला यश आले.
२भोकरपाडा येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपींना चोवीस तासात अटक करून गुन्ह्याचे प्रगटीकरण
३माची प्रबळ जंगलात झालेल्या अज्ञात महिलेचा खून प्रकरणाचा छडा लावून आरोपीला जेरबंद केले.
४व्यतिरिक्त सोनसाखळी चोरांची टोळी पकडून १ किलो ७७ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
५अंतरराज्यात कार्यरत असणारी कार चोरी करणारी टोळी जेरबंद केली. कामोठे ज्वेलर्स पडलेल्या दरोड्याची उकल
६अमली पदार्थ विक्र ी करणाऱ्यांवर एनडीपीएस अॅक्टनुसार कारवाई.