मुंबई : पालिका रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना विविध आजारांवरील १३९ प्रकारच्या रक्तचाचण्या विनामूल्य करून घेता येणार आहेत. दारिद्र्यरेषेखालील कार्डधारकांना या चाचण्या मोफत तर इतर सर्वसामान्य रुग्णांना केवळ ५० रुपये द्यावे लागणार आहेत. पालिकेच्या रुग्णालयांबरोबरच प्रसूतिगृहांमध्येदेखील सुविधा मिळणार आहे.
मुंबई महापालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांतील प्रयोगशाळेत दररोज २४ तास मूलभूत आणि प्रगत चाचण्या केल्या जातात. मात्र अनेक चाचण्यांसाठी रुग्णांना खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेतून चाचण्या करून घेण्यासाठी दोन ते पाच हजार रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयांमध्ये १०१ चाचण्या १०० रुपयांत तर पुढील ३८ प्रगत चाचण्या २०० रुपयांत करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीत मांडला.
मात्र या सर्व चाचण्या मोफत करण्याची सूचना विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मांडली. सर्व चाचण्या मोफत दिल्यास गैरफायदा घेतला जाऊ शकतो, असे मत अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी व्यक्त केले. त्यामुळे ‘बीपीएल’ कार्डधारक रुग्णांना ही सेवा मोफत द्यावी आणि इतर रुग्णांना ५० रुपये शुल्क आकारावे, अशी उपसूचना भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी मांडली. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर झाला़
- च्चार वर्षांच्या कंत्राटासाठी पूर्व उनगरात मेट्रो पॉलिस हेल्थ केअर लिमिटेड काम करणार असून यासाठी २६.८६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये आठ उपनगरीय रुग्णालये, ४७ दवाखाने आणि १० प्रसूतिगृहांत ही सेवा मिळेल.
- च्पश्चिम उपनगरांत थायरोकेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड काम करणार असून चार वर्षांसाठी २९.१४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामध्ये आठ उपनगरीय रुग्णालये, ५८ दवाखाने आणि १३ प्रसूतिगृहांत ही सुविधा मिळेल.
- च्शहर विभागासाठी थायरोकेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड काम करणार असून चार वर्षांसाठी २३.१८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये ५ विशेष रुग्णालये, ७० दवाखाने आणि १० प्रसूतिगृहांत ही सुविधा मिळेल.