बेकायदा बांधकामांचे १३९ गुन्हे दाखल
By admin | Published: August 8, 2015 10:07 PM2015-08-08T22:07:01+5:302015-08-08T22:07:01+5:30
अतिक्र मणासह पर्यावरण संरक्षण कायदा, समुद्र नियमन क्षेत्र अधिनियम (सीआरझेड) आणि महाराष्ट्र नगर रचना अधिनियमाचे खुलेआम उल्लंघन करून, अलिबाग व मुरुड तालुक्यांच्या
अलिबाग : अतिक्र मणासह पर्यावरण संरक्षण कायदा, समुद्र नियमन क्षेत्र अधिनियम (सीआरझेड) आणि महाराष्ट्र नगर रचना अधिनियमाचे खुलेआम उल्लंघन करून, अलिबाग व मुरुड तालुक्यांच्या समुद्रकिनारी बांधलेल्या बेकायदा बंगल्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याचा रायगड जिल्हा प्रशासनाचा धडाका अद्याप सुरू आहे. आतापर्यंत अलिबाग तालुक्यातील १४५ तर मुरुड तालुक्यातील १४१ अशा एकूण २८६ बेकायदा बांधकामांप्रकरणी शुक्रवारी एकूण १३९ गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती अलिबाग उपविभागीय महसूल अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी दिली.
अलिबाग तालुक्यातील ८५ बेकायदा बांधकामांबाबत नगररचना विभागाचे छाननी अहवाल अद्याप येणे बाकी आहेत. ते आल्यावर त्यात निष्पन्न होणाऱ्या बेकायदा बांधकामांबाबत देखील रीतसर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती अलिबागचे तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी दिली. अलिबाग तालुक्यात दाखल झालेल्या या ६९ गुन्ह्यांप्रकरणी ती पाडून टाकण्यासंदर्भात न्यायालयात कॅव्हीएट अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यावरील निर्णयानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे संकपाळ यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
एका दिवसात मुरुडमध्ये सहा गुन्हे दाखल
गुरुवारी एका दिवसात मुरुड पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील पाच ठिकाणी आणि काशिद येथे एका ठिकाणी अशा सहा जागी बेकायदा बांधकामे केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.