मोर्चानंतर ब्राह्मण समाजाच्या १५ पैकी १४ मागण्या मान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 05:10 AM2019-01-23T05:10:29+5:302019-01-23T05:10:47+5:30
ब्राह्मण समाजाने आरक्षणासह विविध १५ मागण्यांसाठी मंगळवारी आझाद मैदानात केलेल्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी १४ मागण्या मान्य केल्याचा दावा ब्राह्मण समाज संघटनेने केला आहे.
मुंबई : ब्राह्मण समाजाने आरक्षणासह विविध १५ मागण्यांसाठी मंगळवारी आझाद मैदानात केलेल्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी १४ मागण्या मान्य केल्याचा दावा ब्राह्मण समाज संघटनेने केला आहे. या आश्वासनांतर १ फेब्रुवारीपासून सवर्ण आरक्षण लागू करण्याचे आश्वासन देत त्याचा फायदा ब्राह्मण समाजाला होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांच्या या आश्वासनांवर तूर्तास आंदोलन स्थगित केल्याची माहिती संघटनेने दिली.
संघटनेच्या संयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या युद्धाच्या इतिहासाचे स्मारक शनिवार वाड्यात करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयारी दर्शवली. शिवाय ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ सुरू करण्यास संमती दिली. या महामंडळासाठी ५०० कोटींची तरतूद करण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचा दावा संघटनेने केला.
इतर धर्मांप्रमाणेच ब्राह्मण पुरोहितांनाही ५ हजार रुपये मासिक मानधन देण्यास सरकार तयार आहे. वर्षातील मोजकेच दिवस पौरोहित्याचे काम मिळत असून इतर दिवस पुरोहित बेरोजगार असतात. त्यामुळे सरकारकडून इतर धर्मीयांच्या धर्तीवर मानधन देण्यास मुख्यमंत्री तयार असल्याचे संघटनेने सांगितले. दरम्यान, लोकसभा निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या लेखी आश्वासनांची पूर्तता न केल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा संघटनेने दिला आहे.