मुंबई : लोकलच्या डब्यातील एका चौरस मीटरमध्ये १४ ते १६ प्रवासी दाटीवाटीने उभे राहून प्रवास करत असल्याचे आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनने (ओआरएफ) सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे. उपनगरीय रेल्वेची परिस्थिती पाहता, रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी स्वतंत्र विभागाची स्थापना करण्याची मागणी आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन (ओआरएफ) या संस्थेतर्फे या अहवालाद्वारे रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली. महामुंबईसाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या एकीकरणाची गरज का? या विषयावर ओआरएफतर्फे चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्रात हा अहवालही सादर करण्यात आला. या चर्चासत्रासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी, भारतीय रेल्वे महामंडळाचे माजी अध्यक्ष विवेक सहाय आदी उपस्थित होते. मुंबई उपनगरीय रेल्वेसेवा ही जगातील सर्वाधिक व्यस्त वाहतूक यंत्रणा आहे. या रेल्वेसेवेद्वारे दररोज २ हजार ८१३ फेऱ्यांमधून सुमारे ८0 लाख प्रवासी प्रवास करतात. देशभरात रेल्वेतून वर्षभरात जेवढे प्रवासी प्रवास करतात, त्यापैकी ३४.७५ टक्के प्रवासी हे फक्त मुंबई उपनगरीय रेल्वे वाहतुकीचा वापर करणारे असतात, अशी माहिती फाउंडेशतर्फे देण्यात आली. रेल्वेचे पश्चिम आणि मध्य रेल्वे असे दोन विभाग असून, त्यांची मुख्यालये मुंबईतच आहेत. तरीही या दोन्ही विभागांमध्ये असलेला प्रशासकीय समन्वयाचा अभाव प्रवाशांसाठी रोजची डोकेदुखी ठरल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अपघातांना ओसंडून वाहणारी गर्दी हे प्रमुख कारण आहे. एका निश्चित धोरणांसह या दोन्ही उपनगरीय रेल्वे विभागाचे एकीकरण करणे हेच एकमेव कारण आहे.महामुंबईची लोकसंख्या वाढतच आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी पूर्व-पश्चिम पर्यायी मार्गाची जोडणी, त्याचे मोनोरेल आणि मेट्रो रेलशी असलेले सुसंगत वेळापत्रक हे रेल्वे विभागाच्या एकीकरणाद्वारे शक्य आहे. प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने, काम करण्याच्या दृष्टीने आणि खरेदी करण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे.
एक चौरस मीटरमध्ये १४ ते १६ प्रवासी
By admin | Published: January 21, 2016 3:55 AM