विधानपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्र्यांसह १४ जणांचे अर्ज, निवडणूक होणार बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 06:49 AM2020-05-12T06:49:40+5:302020-05-12T07:00:17+5:30
उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या डॉ. नीलम गो-हे, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, किरण पावसकर, शिवाजीराव गर्जे, काँग्रेसचे राजेश राठोड, भाजपचे संदीप लेले, रमेश कराड व अपक्ष शेहबाज राठोड या दहा जणांनी आपले अर्ज दाखल केले.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह १० जणांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज सादर केला. २१ मे रोजी नऊ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीकरता एकूण १४ उमेदवार रिंगणात असले तरी ही निवडणूक बिनविरोध होईल असे चित्र आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी अर्ज भरला त्यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य व तेजस तसेच शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या डॉ. नीलम गो-हे, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, किरण पावसकर, शिवाजीराव गर्जे, काँग्रेसचे राजेश राठोड, भाजपचे संदीप लेले, रमेश कराड व अपक्ष शेहबाज राठोड या दहा जणांनी आपले अर्ज दाखल केले. तर भाजपचे गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, डॉ. अजित गोपछेडे आणि प्रवीण दटके यांनी ८ मे रोजी अर्ज भरला होता. राष्टÑवादीकडून किरण पावसकर व शिवाजीराव गर्जे तर भाजपकडून संदीप लेले व रमेश कराड यांनी डमी म्हणून भरले आहेत. अधिकृत उमेदवाराचा अर्ज एखादवेळी अवैध ठरला तर? हा विचार करून असे अर्ज भरले जातात.
छाननीत अधिकृत उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर डमी उमेदवार आपले अर्ज मागे घेतील. उमेदवारी अर्जांची छाननी १२ मे रोजी होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १४ मे आहे.
154.80 कोटींची ठाकरे दाम्पत्याकडे संपत्ती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे १५४ कोटी ८० लाख रुपये इतकी संपत्ती आहे. त्यात उद्धव ठाकरेंकडे २४ कोटी १४ लाख चल संपत्ती आणि रश्मी यांच्याकडे ३६ कोटी १६ लाख रुपयांची अचल संपत्ती आहे.