PNB घोटाळ्यातील बँक अधिकाऱ्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 06:44 PM2018-02-17T18:44:51+5:302018-02-17T18:45:20+5:30
सीबीआयने शनिवारी सकाळी बँकेचे माजी उप-महाव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी, मनोज खरात आणि हेमंत भट यांना ताब्यात घेतले होते.
मुंबई: पंजाब नॅशनल बँकेतील 11 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन जणांची शनिवारी न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली. त्यामुळे आता लवकरच या घोटाळयाची अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
Special CBI Court sends all three PNB Officials in police custody till 3rd march #PNBFraudCasepic.twitter.com/fgo1Rx7g5G
— ANI (@ANI) February 17, 2018
सीबीआयने शनिवारी सकाळी बँकेचे माजी उप-महाव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी, मनोज खरात आणि हेमंत भट यांना ताब्यात घेतले. गोकुळनाथ शेट्टी यांच्या कार्यकाळातच नीरव मोदी यांच्या कंपन्यांना मोठ्याप्रमाणावर लेटर ऑफ अंडरटेकिंग देण्यात आली होती. तर मनोज खरात बँकेत सिंगल विंडो ऑपरेटर पदावर कार्यरत होता. मनोज हा कर्जतमध्ये राहणारा होता. येथील यासीननगरमध्ये त्याचा पंचशील नावाचा बंगला असून त्याचे आई-वडील येथे राहतात. त्याला एक भाऊ एक बहीण असून सर्व उच्चशिक्षित आहेत. वडील पाटबंधारे खात्यात वरिष्ठ पदावर कार्यरत असले तरी त्यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे. मनोजचे बालपण यासीननगरमध्ये गेले असून तो अत्यंत मनमिळाऊ व शांत व्यक्तिमत्त्वाचा असून त्याने असे काही केले असेल यावर येथे कोणाचाच विश्वास बसत नाही. तर हेमंत भट हा नीरव मोदी ग्रूपच्या कंपन्यांचा स्वाक्षरी अधिकारी (ऑथोराईज सिग्नेटरी) होता.
तत्पूर्वी या घोटाळ्याप्रकरणी आरोपी नीरव मोदी व मेहुल चोकसी यांनी भारतात परत यावे आणि तपास यंत्रणांना सामोरे जावे, यासाठी केंद्र सरकारने त्यांच्याविरुद्ध फास आवळायला सुरुवात केली आहे. दोघांचे पासपोर्ट शुक्रवारी निलंबित करण्यात आले. मोदी व चोकसीच्या शोधासाठी सीबीआयने इंटरपोलशी संपर्क साधला आहे. त्यांच्याविरोधात ‘डिफ्यूजन नोटीस’ जारी करण्याची विनंती इंटरपोलला केली आहे. नीरव मोदी १ जानेवारी रोजी तर बेल्जियमचा नागरिक असलेला त्याचा भाऊ निशाल हाही त्याच दिवशी देशातून पळाला. अमेरिकी नागरिक असलेली नीरवची पत्नी ६ जानेवारी रोजी, तर मेहुल चोकसी ४ जानेवारीला भारतातून पळाल्याची माहिती समोर आली आहे.