मुंबई : मालाड मालवणी येथील गावठी दारूमध्ये झालेल्या विषबाधेत मृत्युमुखी पडलेल्या १०४ मृतांपैकी १४ मृतांच्या वारसांना अद्याप नुकसानभरपाईचे एक लाख रुपये मिळाले नसल्याचा आरोप नवनिर्माण संस्थेने केला आहे. सरकारने दिलेली आर्थिक मदत तोकडी असून मृत व्यक्तींच्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची मागणी संस्थेने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.याप्रकरणी अधिक माहिती देताना संस्थेच्या समन्वयक सुषमा खिल्लारी यांनी सांगितले की, मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांचे सर्वेक्षण केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. तहसीलदारांकडे १०४ कुटुंबांची यादी तयार आहे. मात्र तांत्रिक कारणे देत प्रशासनाकडून नुकसानभरपाई मिळण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप खिल्लारी यांनी केला. तर मृतांच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी सुमारे २ हजार रुपयांपासून ८० हजार रुपयांपर्यंत खर्च केल्याचे खिल्लारी यांनी सांगितले. त्यामुळे नुकसानभरपाईचा कुटुंबाला म्हणावा तितका उपयोग झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.परिणामी सरकारने उपचारासाठी केलेला खर्च सरकारने उचलण्याची मागणी संस्थेने केली. शिवाय एकूण बाधित कुटुंबांपैकी ९० टक्के कुटुंबांची कमावती व्यक्ती मृत पावल्याने कुटुंबासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर ७७ टक्के विधवा झालेल्या महिलांपैकी ४५ टक्के महिला २० ते ३५ वयोगटातील आहे. त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुटला नाही, तर त्या व्यभिचाराकडे वळण्याची भीतीही संस्थेने व्यक्त केली आहे. भयानक बाब म्हणजे ५२ टक्के मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून ते बालमजुरीकडे वळण्याची शक्यताही संस्थेने व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत १४ कुटुंबे
By admin | Published: October 14, 2015 3:13 AM