मुंबई : कोरोनामुळे मानवी जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. नागरिकांच्या राहणीमानाबाबत असणाऱ्या अपेक्षा देखील बदलल्या आहेत. जगभरातील मोठ्या शहरांमध्ये प्रामुख्याने हा बदल दिसून येत आहे. नाईट फ्रँक इंडियाने नुकत्याच केलेल्या ग्लोबल बायर सर्वेक्षणात भारतातील १४ टक्के नागरिक हे येत्या बारा महिन्यांमध्ये आपले घर बदलण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. यातील ५५ टक्के भारतीय मोठ्या शहरांमध्ये घर घेण्यास इच्छुक आहेत तर ३६ टक्के भारतीय उपनगरांमध्ये घर घेण्यास इच्छुक आहेत.
या सर्वेक्षणात जगभरातील ४९ ठिकाणांमधील सुमारे ९०० जणांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या आहेत. निम्म्याहून अधिक नागरिक हे आशिया-पॅसिफिक खंडातील रहिवासी आहेत. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार आशिया पॅसिफिक खंडातील सुमारे १९ टक्के नागरिकांनी कोरोना महामारीची सुरुवात होताच आपले घर बदलले आहे. १५ टक्के नागरिक येत्या १२ महिन्यांत आपले घर बदलू पाहत आहेत. जागतिक स्तरावर ४ पैकी १ व्यक्ती पुढील काळात आपले घर बदलण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.
आशिया पॅसिफिक खंडातील २२ टक्के नागरिक मोठ्या घराच्या गरजेमुळे घर बदलण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. तर ५० टक्के नागरिक हे आपल्या कुटुंबाजवळ राहता यावे यासाठी घर बदलण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. सिंगापूर मधील १० टक्के, फिलिपिन्स मधील १५ टक्के, हाँगकाँग मधील १८ टक्के तर चीनमधील सुमारे ५० टक्के नागरिक येत्या बारा महिन्यांमध्ये आपले घर बदलण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. या सर्वेक्षणानुसार आशिया खंडातील सुमारे ४० टक्के लोकांनी मोठ्या शहरांमध्ये आपले घर असावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर ३२ टक्के लोक उपनगरांमध्ये घर घेण्यास इच्छुक आहेत.