बीकेसी येथे पुलाचा भाग कोसळून १४ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:06 AM2021-09-18T04:06:24+5:302021-09-18T04:06:24+5:30
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने वांद्रे पूर्वेकडील बीकेसीमधील एमटीएनएल जंक्शन येथे हाती घेण्यात आलेल्या पुलाच्या कामाचा ...
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने वांद्रे पूर्वेकडील बीकेसीमधील एमटीएनएल जंक्शन येथे हाती घेण्यात आलेल्या पुलाच्या कामाचा काही भाग शुक्रवारी पहाटे ४ वाजता कोसळून झालेल्या दुर्घटनेत १४ कामगार जखमी झाले. या १४ जखमींना व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अपघातग्रस्तांची प्रकृती स्थिर आहे. अनिल सिंग, अरविंद सिंग, अझहर अली, मुस्तफ अली, रियाझुद्दिन, मोतलाब अली, रियाझू अली, श्रावण, अतिश अली, रलीस अली, अझीझ उल हक, परवेझ, अकबर अली, श्रीमंद अशी जखमींची नावे आहेत.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि मुंबई अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. शिवाय वेगाने मदत कार्य हाती घेण्यात आले होते. पडलेला भाग उचलण्याचे काम सुरू असतानाच जखमींना वेगाने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुपारचे दोन वाजले तरी येथील गर्डर उचलण्यात आला नव्हता.
या रस्त्यावर सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असते. शिवाय प्रकल्पाचे काम सुरू असल्याने ठिकाणी बॅरिकेड करण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता आणखी अरुंद झाला आहे. अरुंद रस्ता आणि ऐनवेळी झालेली कोंडी या दोन घटकांमुळे अपघाताची शक्यता आहे. प्राधिकरण आणि वाहतूक पोलीस यांनी येथे योग्य ते नियोजन करावे, असे म्हणणे वाहन चालक मांडत आहेत.
बीकेसी आणि कुर्ला उड्डाणपुलाला जोडणाऱ्या कामादरम्यान झालेली दुर्घटना सुरक्षा मानक आणि नियमांचे उल्लंघन असून, यात झालेला अक्षम्य निष्काळजीपणा लक्षात घेता संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.