लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पित्तामुळे नसा दबल्याचे सांगून साडे चौदा लाखांची लूट करणाऱ्या बोगस युनानी डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ला यश आले आहे. मोहम्मद शेरू शेख मकसुद खॉ उर्फ डॉ. आर. पटेल (४९), मोहम्मद नफीस मोहम्मद शरीफ (३९), मोहम्मद आसिफ मोह. निसार (२७) , मोहम्मद अशिफ मोह. शरीफ (४४) अशी अटक आरोपींची नावे असून मालेगावमधून त्यांच्यावर कारवाई केली आहे. या टोळीने अशाच प्रकारे ७ जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
तक्रारदार यांना असलेल्या ट्रेमर या आजारावर उपचार करून त्यांना तत्काळ बरे करण्याचे आश्वासन दिले. पाटील यांच्या वडाळा येथील निवासस्थानी येऊन आरोपी पटेल व त्याच्या सहायकाने तपासणी केली. त्यावेळी पित्तामुळे त्यांच्या शरीरातील नसा दबल्याचे सांगून, त्यामुळेच तक्रारदार यांचे दोन्ही हात थरथरत असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही बाजूस छिद्र असलेली मेटल क्युबने (तुंबडी) तक्रारदार यांच्यादोन्ही हाताला व पाठीला लावले. त्यावेळी आरोपींनी तक्रारदाराचे रक्त साठवून झालेल्या व्रणावर रसायन टाकले. त्यावेळी तेथील रंग पिवळा झाल्याचे दाखवून तक्रारदार यांच्या शरीरात वाढलेले पित्त बाहेर काढत असल्याचे भासवून त्यांच्याकडून १४ लाख ५० हजार रुपये उकळले. पुढे आणखीन पैशांची मागणी होताच त्यांना संशय आला. फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच, त्यांनी मुंबई पोलिसांकडे धाव घेतली.
राजस्थानमधील चौकडी जाळ्यात
गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ने याप्रकरणी समांतर तपासाला सुरुवात केली. तपासात आरोपी हे राजस्थान तसेच ते पालघऱ येथील मनोर, ठाण्यातील भिवंडी व नाशिकमधील मालेगांव येथे राहत असल्याचे समजले. त्याप्रमाणे गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. मात्र, आरोपी सतत ठिकाण बदलत असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे आव्हान गुन्हे शाखेसमोर होते. नाशिक येथील मालेगाव परिसरातून चौकडीला अटक केली. चौकडी ही राजस्थानमधील रहिवासी आहेत.
युनानी पद्धतीने उपचार
युनानी डॉक्टर असल्याची बतावणी करून नागरिकांच्या घरी येऊन उपचाराच्या बहाण्याने एक टोळी फसवणूक करत असल्याची माहिती मिळाली होती. याच टोळीच्या जाळ्यात अडकून वडाळा येथील रहिवासी असलेल्या राजेश पाटील (६१) यांची फसवणूक झाली होती. पाटील यांच्या तक्रारीवरून मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पाटील यांच्या तक्रारीनुसार, २६ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालवधीत नरिमन पॉईंट येथे कामानिमित्त गेले असताना त्यांची, राकेश अग्रवाल (४०), डॉ. आर. पटेल (५०) व डॉक्टरांचे सहायक मनीष ( ३५) या नावाने आरोपींनी पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी गुजरात अहमदाबाद येथे युनानी उपचार पद्धतीचे रुग्णालय असल्याचे सांगून संवाद वाढवला.
मोबाईलसह सिमकार्ड जप्तवैद्यकीय उपचारासाठी वापरण्यात आलेले साहित्य, ९ मोबाइल संच, सिमकार्ड व कार तसेच फसवणुकीतील १४ लाख रुपये हस्तगत करण्यात आले.या पथकाची कामगिरीपोलिस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) राज तिलक रौशन सहा. पोलिस आयुक्त दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष- ३ चे प्रभारी पोलिस निरीक्षक दीपक सुर्वे, सहायक पोलिस निरीक्षक समीर मुजावर, अंमलदार कृतिबास राऊळ, अरुण घाटकर, वैभव गिरकर, सचिन सरवदे, अंमलदार विकास चव्हाण, राहुल पाटील, गोविंद पानखडे, अनिकेत मोरे यांनी ही कारवाई केली आहे.