‘इंडिया’चे १४ जण ठरविणार लोकसभेची रणनीती, संयोजकाऐवजी समन्वय समिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 09:08 AM2023-09-02T09:08:08+5:302023-09-02T09:10:56+5:30
आगामी निवडणुका लक्षात घेता ही समिती देशभराचा दौरा करून पुढील रणनीती ठरविणार आहे.
मुंबई : इंडिया आघाडीत संयोजक कोण? हा कळीचा मुद्दा ठरत असल्याने अखेर समन्वय समितीने त्यावर तोडगा काढण्यात आला. लोकसभा निवडणुकीची रणनीती १४ जणांची समिती ठरवणार आहे. या समितीत काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्ष शरद पवार यांची निवड करण्यात आली असून शिवसेना ठाकरे गटाकडून संजय राऊत यांना स्थान देण्यात आले आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता ही समिती देशभराचा दौरा करून पुढील रणनीती ठरविणार आहे.
समन्वय व निवडणूक रणनीती समिती
या समितीत के.सी. वेणुगोपाल, शरद पवार यांच्यासह जेएमएमचे हेमंत सोरेन, आरजेडीचे तेजस्वी यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, आपचे राघव चड्डा, समाजवादी पक्षाचे जावेद अली खान, जेडीयू युनायटेडचे लल्लन सिंग, सीपीआयचे डी. राजा, ओमर अब्दुला, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती आणि सीपीआयएमकडून लवकरच नाव निश्चित केले जाणार आहे.
प्रचार समिती
या समन्वय समितीबरोबरच १९ सदस्यांची प्रचार समिती जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून गुरदीप सिंग सापल, शिवसेनेकडून अनिल देसाई, राष्ट्रवादीकडून पी.सी. चाको, राजदचे संजय यादव, जेडीयू संजय झा यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. त्याशिवाय जेएमएमकडून चंपाई सोरेन, सपाकडून किरणोमय नंदा, आपकडून संजय सिंग, सीपीआयएम अरुण कुमार, सीपीआय बिनोय विश्वम, राष्ट्रवादी काँग्रेसचे हसनेन मसुदी, आरएलडीचे शाहीद सिद्दकी, आरएसपीचे एन.के. प्रेमाचंद्रन, एआयएफबीचे जी. देवराजन आणि सीपीआय (एमएल)कडून रवी राय यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
सोशल मीडिया समिती
सोशल मीडियाची जबाबदारी संभाळण्यासाठी एकूण १२ जणांची समिती जाहीर केली आहे. त्यात सुप्रिया श्रीनाटे, सुमित शर्मा, आशिष यादव, राजीव निगम, राघव चड्डा आदींचा समावेश आहे. त्याबरोबरच मीडियासाठीही समिती जाहीर करण्यात आली असून त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, मनोज झा, शिवसेनेचे अरविंद सावंत, सपाचे आशिष यादव आदींचा समावेश आहे.
संशोधनासाठीही समिती
संशोधनासाठीही समिती जाहीर केली आहे. अमिताभ दुबे, सुबोध मेहता, प्रियंका चतुर्वेदी, वंदना चव्हाण, के.सी. त्यागी, जासमिन शहा आदींचा समावेश आहे.
एकच विश्वास : भाजपचा पराभव होईल
आम्ही विरोधक नाही, तर देशप्रेमी : उद्धव ठाकरे
परिवारवाद म्हणून आमच्यावर टीका केली जाते. पाटण्याच्या बैठकीत मी सांगितले होते की, भारत माझा परिवार आहे. त्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही विरोधक नाही तर देशप्रेमी आहोत. देशाला वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहेत. मुंबईतील बैठकीत इंडियाची ताकद वाढली. दिवसेंदिवस इंडिया मजबूत होत आहे. त्यामुळे एनडीएच्या मनात भीती वाढली आहे.
घमेंडिया कोण हे देश बघतोय : शरद पवार
इंडिया आघाडीचा उल्लेख भाजपचे नेते ‘घमेंडिया आघाडी’ असा करतात. मात्र, आम्ही केवळ एकत्र येण्याची चर्चा केली तरी त्यावर भाजपचे नेते टीका करतात. आम्ही भेटलो तर त्यावरही टीका करतात. यावरून असे दिसते की, १० वर्ष देशाची सत्ता भोगूनही हे जमिनीवर नाहीत. यावरून घमेंडिया कोण आहे हे दिसते. आमच्यावर कितीही टीका केली तरी आता आम्ही थांबणार नाही.
१५ लाख जमा होणार म्हणून घरातल्या अकरा जणांची खाती उघडली
खोटं बोलून, अफवा पसरवून सत्ताधारी सत्तेत आले. आमच्या विरोधात असा अपप्रचार केला गेला, की आमचा पैसा स्वीस बँकेत आहे. त्यावेळी मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होणार असे सांगितले होते. आम्हीही आमचे खाते उघडले होते. आमच्या सात मुली, दोन मुले आणि आम्ही पती-पत्नी असे ११ जणांचे खाते उघडले. आम्हाला वाटले खूप पैसे मिळतील. मात्र, तो जुमलाच होता. सगळ्या देशातल्या लोकांची बँक खाती उघडण्यात आली. काय मिळाले तुम्हाला? अशी मिश्कील टिप्पणी लालूप्रसाद यादव यांनी केली.
येचुरींना लाल सलाम
लालूप्रसाद यादव यांनी जाताना सीपीआयएमचे नेते सीताराम येचुरी यांना लाल सलाम म्हणत निरोप दिला. त्यांचा तो सलाम स्वीकारत येचुरी यांनीही ‘जय हिंद’ म्हणत हाच इंडियामधला सलोखा असल्याचे सांगितले.
‘इंडिया’च्या लोगोचे अनावरण दिल्लीत
इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण अखेर लांबणीवर पडले. आघाडीत नवीन पक्ष आल्याने त्यांचेही या लोगोवर एकमत होणे आवश्यक असल्याने अनावरण पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. एक-दोन दिवसात लोगोचे अनावरण दिल्लीत होईल, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. लोगोसाठी एकूण पाच ते सात पर्याय आहेत. हे सर्व लोगो नव्याने आलेले पक्ष आणि समितीसमोर ठेवले जातील, त्यानंतर यावर अंतिम निर्णय होईल.
देशाला किंमत मोजावी लागली : लालूप्रसाद यादव
काहीही झालं तरीही आम्ही जिंकणारच, जागा वाटपावरून आम्ही वाद घालणार नाही. इंडिया जिंकणारच. आम्ही एकत्र नसल्याची किंमत देशाला मोजावी लागली. दलित आणि अल्पसंख्याक वर्ग सुरक्षित नाही. एकीकडे इतकी गरिबी आहे, महागाई आहे आणि सांगितले जाते की देश विकास करतो आहे. विरोधकांच्या मागे ईडी, सीबीआय लावून छळले मात्र आम्ही घाबरणार नाही.
त्यांना देशाचा इतिहास बदलायचाय : नितीश कुमार
आम्ही आमचा प्रचार करत राहू. जे आता केंद्रात आहेत ते पराभूत होऊन घरी जातील. कारण हे सरकार काम कमी आणि जाहिरात जास्त करते. माध्यमांवर मोदी सरकारचा ताबा आहे. आम्ही ठरवले आहे की, आतापासून आम्ही लवकर काम करू. कारण वेळेआधी निवडणुका होऊ शकतात. या लोकांना देशाचा इतिहास बदलायचा आहे. पण, आम्ही तो बदलू देणार नाही.
इंडिया आघाडीत केवळ २८ पक्ष नसून १४० कोटी जनता एकत्र आली आहे. मोठ्या संख्येने लोक एकत्र येत आहेत. परदेशात सतत फिरणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हुकूमशाहीच्या जोरावर देशाची इभ्रत चव्हाट्यावर आणली आहे. त्यांचा पराभव करण्यासाठी ही आघाडी एकत्र आली आहे. कोणीही पदासाठी, प्रगतीसाठी आलेले नाही. प्रत्येकाने जबाबदारी वाटून घेतली आहे.
महागाई, बेरोजगारीविरोधात लढा, हाच अजेंडा : खरगे
देशातील महागाई कशी कमी करता येईल, बेरोजगारीविरोधात कसे लढता येईल, हाच आमचा अजेंडा आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत आहेत. केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरवर १०० रुपयांची वाढ करते आणि दोन रुपये कमी करते. या सरकारने गरिबांच्या खिशातून पैशांची चोरी केली आहे. गरिबांचा पैसा उद्योगपतींच्या खिशात घालता जात आहे.
इंडियाच्या बैठकीत इस्रोचे अभिनंदन
इंडिया आघाडीच्या बैठकीत चंद्रयान मोहीम यशस्वी करणाऱ्या इस्रोच्या सर्व परिवाराचे अभिनंदन करण्यात आले. इस्रोने केलेल्या कामगिरीबद्दल इंडियाच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला. अभिनंदन प्रस्तावात म्हटले आहे की, इस्रो मजबूत होण्यासाठी सहा दशके लागली आहेत. चंद्रयान-३ ने जगाला आश्चर्यचकित केले आहे. आता पूर्ण जग पुढील आदित्य-एल १ प्रक्षेपणाची आतुरतेने वाट पाहत आहे.