सुसाट ‘बाईक अॅम्ब्युलन्स’, 24 तासांत 14 रुग्णांवर उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 02:35 PM2017-08-04T14:35:36+5:302017-08-04T15:24:50+5:30
आपातकालीन परिस्थितीमध्ये अॅम्ब्युलन्स वाहतूक कोंडीत अडकल्याने निर्माण होणा-या समस्यांचा सामना करण्यासाठी ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सेवा सुरु करण्यात आली आहे.
मुंबई, दि. 4 - मुंबईकरांसाठी नव्याने सुरु करण्यात आलेली ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सेवेत दाखल होताच सुसाट सुटली आहे. लोकांनी राज्य सरकारच्या या नव्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला असून फक्त 24 तासांमध्ये 14 रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी ही माहिती दिली आहे. आपातकालीन परिस्थितीमध्ये अॅम्ब्युलन्स वाहतूक कोंडीत अडकल्याने निर्माण होणा-या समस्यांचा सामना करण्यासाठी ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सेवा सुरु करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांकडे वेळीच पोहोचून उपचार करणं शक्य होत आहे.
‘बाईक अॅम्ब्युलन्स’मुळे फक्त 24 तासांत 14 रुग्णांवर उपचार करणं शक्य झालं आहे. यामधील दोन रुग्णांवर बुधवारी, तर १२ रुग्णांवर गुरूवारी उपचार करण्यात आल्याची माहिती दिपक सावंत यांनी दिली आहे.
राज्य सरकारने पुढाकार घेत ही बाईक अॅम्ब्युलन्स सुरु केली आहे. विशेष म्हणजे ही बाईक अत्यंत आधुनिक असून यामध्ये गरजेच्या सर्व सोयींची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रथोमपचारासाठी आवश्यक असणारं सर्व साहित्य या बाईक अॅम्ब्युलन्समध्ये उपलब्ध आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या बाईक अॅम्ब्युलन्सवर एक प्रशिक्षित पॅरामेडिक-डॉक्टर असतो.
'बाईक अॅम्ब्युलन्स' सेवा सुरु करणारं महाराष्ट्र चौथं राज्य आहे. याआधी गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये ही सेवा सुरु करण्यात आली आहे. सध्या मुंबईपुरती मर्यादित असणारी ही 'बाईक अॅम्ब्युलन्स' सेवा कालांतराने संपुर्ण राज्यभर सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे.
मुंबईतील भांडुप, मानखुर्द, नागपाडा, मालाड, चारकोप,गोरेगाव, ठाकूरगाव, कलिना आणि खारदांडा या भागात या ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ रस्त्यांवर धावताना दिसतील. या ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सेवेत, प्रशिक्षित डॉक्टरसह 10 मोटर बाईक आहेत. ज्यांना ही ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सेवा हवी असेल त्यांना 108 या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. तुम्ही संपर्क साधल्यानंतर थोड्याच वेळात जवळ असलेली ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ तुमच्या घरी पोहोचते.
या ‘बाईक अॅम्ब्युलन्स’वरील डॉक्टर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हातळण्यास सक्षम असल्याचा दावा आरोग्य विभागाचा आहे.
बाईक अॅम्ब्युलन्समध्ये काय काय आहे ?
- प्रथमोपचाराची आवश्यक साधने
- आपत्कालीन उपाचार साहित्य
- हार्ट अटॅकवेळी द्यावयाची औषधं
- ऑक्सिजन मास्क
- विविध इंजेक्शन, गोळ्या
- भाजलेल्या, बुडालेल्या रुग्णांसाठी आवश्यक उपचार साहित्य