तीन उपायुक्तांसह १४ पोलिसांच्या बदल्या
By admin | Published: June 29, 2015 02:42 AM2015-06-29T02:42:21+5:302015-06-29T02:42:21+5:30
शहर पोलीस आयुक्तालयातील ३ पोलीस उपायुक्तांसह ११ निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी काढले आहेत.
जितेंद्र कालेकर, ठाणे
शहर पोलीस आयुक्तालयातील ३ पोलीस उपायुक्तांसह ११ निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी काढले आहेत. या बदल्या प्रशासकीय कारणास्तव केल्याचे आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले असले तरी काही अधिकाऱ्यांमध्ये गम तर काहींकडून समाधान व्यक्त होत आहे.
विशेष शाखेत असूनही ठाणे शहर या परिमंडळात एकाच वेळी ठाणे स्थानकाजवळील ३०० जुगाऱ्यांवर अटकेची कारवाई करणारे उपायुक्त सचिन पाटील यांना ठाणे शहर परिमंडळात आणण्यात आले आहे. परिमंडळ १चे प्रभाकर बुधवंत यांना आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सचिन पाटील यांच्या जागी मुंबईतून आलेले केशव पाटील यांच्यावर विशेष शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
उपायुक्तांप्रमाणेच काही पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या झाल्या आहेत. यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डी.डी. टेळे यांना कासारवडवली पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. कासारवडवलीचे विलास सूर्यवंशी यांची विशेष शाखेत बदली झाली आहे. त्याचप्रमाणे नौपाड्याचे दिलीप पगारे, कल्याणच्या महात्मा फुले चौक (एमएफसी) पोलीस ठाण्याचे दिनेश कटके, एस.डी. कोरडे यांचीही विशेष शाखेत साईड ब्रँचला बदली झाली आहे. तर एमएफसीचेच विजय भिसे यांना दहशतवादविरोधी पथकात आणण्यात आले आहे. याशिवाय, रायगड येथून आलेले दत्तात्रय पांढरे यांना एमएफसीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची सूत्रे मिळाली आहेत. टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव भोर यांची ठाणे नियंत्रण कक्षात बदली झाली असून, त्यांच्या जागी कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी धुमाळ यांची नियुक्ती झाली आहे. कोळसेवाडीचे वरिष्ठ निरीक्षक एस.एल. डवले यांच्याकडे पोलीस आयुक्त कार्यालयातील तक्रार निवारण कक्षाची जबाबदारी सोपविली आहे. कोळसेवाडीच्याच बी.जी. रोहम यांची एमएफसी पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली आहे.
भोरांना भोवले लिमये खून प्रकरण?
फेब्रुवारी २०१५मध्ये डोंबिवलीतील टिळकनगर या उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या कल्पना लिमये यांची राहत्या घरात दिवसाढवळ्या हत्या झाली होती. त्यांच्या मारेकऱ्याचा चार महिने उलटूनही पोलिसांना शोध घेता आला नाही. वरिष्ठांच्या नाराजीमुळेच त्यांची बदली झाल्याची चर्चा आयुक्तालयाच्या वर्तुळात आहे. अर्थात, भोर आणि धुमाळे दोघेही बदलीच्या ठिकाणी हजर झालेले नाहीत.
उपायुक्तांप्रमाणेच काही पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या झाल्या. यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डी.डी. टेळे यांना कासारवडवली पोलीस ठाण्यात तर नौपाड्याचे दिलीप पगारे, एमएफसीचे दिनेश कटके, एस.डी. कोरडे यांचीही विशेष शाखेत साईड ब्रँचला बदली झाली.