शिवसेनेचे १४ खासदार आमच्या संपर्कात, २४-२५ आमदार नाराज; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 01:08 PM2022-04-05T13:08:13+5:302022-04-05T13:08:53+5:30
शिवसेनेचे १८ पैकी १४ खासदार आमच्या संपर्कात; योग्य वेळी जाहीर करू; भाजपचे नेते प्रसाद लाड यांचा दावा
मुंबई: शिवसेनेचे १४ खासदार संपर्कात असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते प्रसाद लाड यांनी केला आहे. शिवसेनेचे २४-२५ आमदार नाराज असल्याचा दावाही त्यांनी केला. शिवसेनेचे कोणते खासदार भाजपच्या संपर्कात आहेत, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. माध्यमांशी संवाद साधताना लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. तळमळतंय, जळमळतंय असं मुख्यमंत्री सभागृहात म्हणाले होते. मात्र त्यांना स्वत:च्याच पक्षातील खासदारांची तळमळ, जळमळ दूर करता आलेली नाही. मात्र त्यावरचं चूर्ण आमच्याकडे आहे आणि आम्ही ते योग्यवेळी देऊ, असा टोला लाड यांनी लगावला.
शिवसेना नेत्यांना पालकमंत्री दाद देत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनातील मळमळ स्पष्ट दिसून येत असल्याचं लाड म्हणाले. शिवसेनेचे १८ पैकी १४ खासदार आमच्या संपर्कात आहेत. योग्यवेळी ते आम्ही जाहीर करू, असं लाड म्हणाले. मात्र ही योग्य वेळ कधी येणार ते त्यांनी सांगितलं नाही. लाड यांच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मशिदींवरील भोंग्यांबद्दल मनसे प्रमुख राज यांनी मांडलेल्या भूमिकेचं लाड यांनी स्वागत केलं. बाळासाहेब ठाकरेंनी भोंगे आणि अजानबद्दल घेतलेली भूमिका शिवसेनेनं बदलली आहे. शिवसेनेची बदललेली भूमिका मुख्यमंत्री ठाकरे स्वत: जाहीर करणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मनसेनं घेतलेली हिंदुत्वाची भूमिका चांगली बाब आहे. तशी भूमिका पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे घेऊ शकतात का, असा सवाल त्यांनी विचारला.