१४ सीमकार्ड पुरविणारा गुजरातमधून ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:06 AM2021-03-23T04:06:59+5:302021-03-23T04:06:59+5:30
तपासाला वेग : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग आला ...
तपासाला वेग : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, गुजरातहून १४ सीमकार्ड पुरविणाऱ्या व्यक्तिला राज्य दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे याप्रकरणी कसून चौकशी सुरू आहे.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आल्याचा दावा एटीएसने केला आहे. यात सचिन वाझे हा मुख्य आरोपी असून, त्याच्या दोन साथीदारांंना रविवारी एटीएसने अटक केली. यात निलंबित पोलीस विनायक शिंदे आणि बुकी नरेश गोरचा समावेश होता. गोरने अहमदाबाद येथून बनावट कागदपत्रांच्या आधारे प्राप्त केलेल्या सीमकार्डचा वापर करण्यात आला होता, अशी माहिती तपासात समोर आली. त्यानुसार सोमवारी तपास पथक गुजरातला रवाना झाले. याप्रकरणात १४ सीमकार्ड पुरवणाऱ्या व्यक्तिला एटीएसने ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याची माहिती एटीएसने दिली. या सीमकार्डचा वापर कसा आणि कुठे करण्यात आला होता? याबाबत एटीएस अधिक तपास करत आहेत. तसेच या प्रकरणात लवकरच ताब्यात घेतलेल्या व्यक्तिला अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दुसरीकडे मुंबई आणि ठाणे पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांसह चकमक फेम निवृत्त अधिकाऱ्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्यांच्यावरही अटकेची टांगती तलवार असल्याचे समजते. यापैकी दोन अधिकाऱ्यांची यापूर्वी एटीएसकड़ून चौकशी झाली आहे. यात, त्यांचा सहभाग स्पष्ट होताच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एटीएसच्या सुत्रांकडून मिळाली.
........................