१४ गावांची भिस्त एक केंद्रावर
By admin | Published: February 10, 2015 10:30 PM2015-02-10T22:30:32+5:302015-02-10T22:30:32+5:30
रुग्णांच्या आरोग्यासाठी नेहमी तत्पर असणारे आरोग्य खाते, तसेच ई-आरोग्याच्या वल्गना करणारे शासन, नांदवी आरोग्य केंद्राच्या बाबतीत मात्र उदासीन असल्याचे दिसत आहे.
पूनम धुमाळ, गोरेगाव
रुग्णांच्या आरोग्यासाठी नेहमी तत्पर असणारे आरोग्य खाते, तसेच ई-आरोग्याच्या वल्गना करणारे शासन, नांदवी आरोग्य केंद्राच्या बाबतीत मात्र उदासीन असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील नांदवी आरोग्य केंद्र हे गेली कित्येक वर्षे भाड्याच्या जागेत चालवले जात आहे. या आरोग्य केंद्रातील अनेक पदे रिक्त आहेत. आरोग्य केंद्राची स्थापना २००० साली झाली. या केंद्रांतर्गत १४ गावे, १९ वाड्या अशी एकूण ९ हजार लोकसंख्या आहे. केंद्रातील ओपीडीत दररोज किमान २५ ते ३० लोकांची तपासणी केली जाते. मात्र अपूर्ण जागा, अस्वच्छता, मनुष्यबळाच्या अभावामुळे रुग्णांना योग्य सेवा देणे दिवसेन्दिवस कठीण होत आहे. त्यामुळे रुग्णांबरोबरच आरोग्य केंद्रही आजारी पडले की काय, असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. आरोग्य केंद्रातील प्रसूतिगृह तसेच इतर विभागातही मोठ्या समस्या भेडसावत आहेत.
आरोग्य केंद्रासाठी बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीचे उद्घाटन २००२-०३ मध्ये झाले आहे. या इमारतीत आॅपरेशन विभाग, स्त्री-पुरुष कक्ष, वैद्यकीय अधिकारी कक्ष यांसाठी ६९ लाखांची मंजुरी देण्यात आली, तसेच इतर विविध महत्त्वाच्या कामांसाठी ७८ लाखांची वाढीव मागणी जिल्हा परिषदेकडे करण्यात आली. मात्र ती अद्यापही मंजूर केली गेलेली नाही. इमारतीचे बांधकामही सध्या धीम्या गतीने होत असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत.
टोल, भांडीवली, नांदवी, पुरार, वणी, हर्कोल कोंड अशी एकूण १४ गावे, तसेच टोळ वाडी, बुद्धवाडी, कुंभारवाडा, मोहल्ला अशा एकूण १९ वाड्यांवरील नागरिकांसाठी हे एकमेव आरोग्य केंद्र असून योग्य आरोग्य सेवा मिळत नसल्याने रुग्णांमध्ये नाराजी आहे.