मुंबई : कोरोनाच्या संकटात गेल्या तीन-चार महिन्यांत देशभरातील बेरोजगारी आणि गरिबी वाढली आहे. वडिलांचा मृत्यू आणि आईचे आजारपण यामुळे माटुंगा येथील १४ वर्षीय मुलावर चहा विकून घर चालविण्याची वेळ आली आहे. सागर माने असे या मुलाचे नाव आहे. कोरोनामुळे कुटुंबीयांवर ओढवलेल्या आर्थिक समस्येचे हे विदारक चित्र आहे.
माटुंगा परिसरात गस्त घालत असताना पोलीस अमलदार ओंकार व्हनमारे यांचे सागर माने या मुलाकडे लक्ष गेले. त्याच्याकडे कलेल्या चौकशीत आजारी आईच्या उपचारासाठी चहा विक्रीतून पैसे जमवत असल्याचे समजले. त्यांनी त्याला मदत करत, दहावीची वह्या पुस्तकेही विकत घेऊन दिली. व्हनमारे हे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत.
पोलीस व्हनमारे यांनी सांगितले की, गुरुवारी माटुंगा (दादर) येथे बंदोबस्त करीत असताना एका १४ वर्षांच्या मुलाने चहा घेणार का? असे विचारले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी चहा नको, असे त्याला सांगितले. त्या मुलाला बोलावून व्हनमारे यांनी त्याची विचारपूस केली. त्यावर त्याने आपले नाव सागर माने असून २९ मार्चला वडिलांचा मृत्यू झाला आहे.
वडिलांचे चहाचे कॅन्टीन होते. आई आजारी असते. त्यामुळे घर चालविण्याची जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागली. घरखर्चासाठी मी चहा बनवून विकतो आणि रोज साधारण २०० रुपये मिळवत असल्याचे त्याने सांगितले. तुला पुढे शिकायचे आहे का? असे त्या त्याला विचारले असता त्याने तत्काळ उत्तर दिले, मला पोलीस व्हायचे आहे. दरम्यान, पोलीस ओम्कार व्हनमारे यांनी त्याला १० वीची पुस्तके घेऊन दिली आणि अभ्यास करण्यासाठी काही अडचण आल्यास संपर्क करण्यास सांगितले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले कौतुक
वडिलांचे छत्र हरपल्याने आजारी आईसाठी रस्त्यावर चहा विकणाऱ्या मुलासाठी पोलीस शिपायाने मदतीचा हात पुढे केला आहे. त्याला आर्थिक मदतीबरोबरच शालेय वस्तू देत, भविष्यात मदत लागल्यास त्यांचा मोबाइल क्रमांकाही दिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचे ट्विटरवरून कौतुक केले आहे.
कर्तव्यापलीकडची सेवा : लॉकडाऊनच्या काळात व्हनमारेसारखे अनेक जण कर्तव्यापलीकडे जात सेवा बजावत आहेत. काही दिवसांपूर्वीच आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्रिया गरुड यांच्यामुळे भरपावासात रस्त्यावरच प्रसूती झालेल्या गर्भवती महिलेला आणि त्यांच्या नवजात बालकाला जीवनदान मिळाले. तर कफपरेड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई तेजस सोनावणे यांनी स्वखर्चातून खासगी वाहनाला रुग्णवाहिका बनवून मोफत सेवा देत आहेत.