पुराच्या १४ वर्षांनंतरही ब्रिमस्टोवड प्रकल्पाची निम्मी कामे अपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 04:48 AM2019-07-04T04:48:53+5:302019-07-04T04:49:04+5:30

२६ जुलै २००५ रोजी झालेल्या विक्रमी पावसामुळे मुंबईत पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर महापालिकेने ब्रिमस्टोवड प्रकल्प हाती घेतला

 14 years after the flood, half of Brimestown project work is incomplete | पुराच्या १४ वर्षांनंतरही ब्रिमस्टोवड प्रकल्पाची निम्मी कामे अपूर्ण

पुराच्या १४ वर्षांनंतरही ब्रिमस्टोवड प्रकल्पाची निम्मी कामे अपूर्ण

Next

मुंबई : जागतिक दर्जाचे मुंबई शहर पहिल्याच पावसात तुंंबले. याचा दोष महापालिका प्रशासन पावसाला देत असले, तरी पर्जन्य जलवाहिन्यांची अपुरी कामेही तेवढीच कारणीभूत आहेत. आतापर्यंतचा सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचा हा पाऊस असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, २००५ सालामध्ये ओढावलेल्या पुराला १४ वर्षे उलटली, तरी ब्रिमस्टोवड प्रकल्पातील कामे अर्धवट झाली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून नेण्याची पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता कमी पडत आहे.
मंगळवारी पश्चिम उपनगरात ३२९ मि.मी. तर पूर्व उपनगरात ३०९ मि.मी. पाऊस पडला. मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्या ताशी २५ मि.मी. पावसाचे पाणी वाहून नेऊ शकतात. २६ जुलै २००५ रोजी झालेल्या विक्रमी पावसामुळे मुंबईत पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर महापालिकेने ब्रिमस्टोवड प्रकल्प हाती घेतला. यामुळे पर्जन्य वाहिन्यांची क्षमता ताशी ५० मि.मी.ने वाढणार आहे. मात्र, या प्रकल्पाचा खर्च तीनपट वाढला, तरी कामे अद्याप संथगतीने सुरूच आहेत.
परिणामी, मुंबईची प्रत्येक पावसाळ्यात तुंबापुरी होऊ लागली आहे. ब्रिमस्टोवड प्रकल्पाची कामे पूर्ण झाल्यानंतरच, पावसाच्या पाण्याचा निचरा जलद गतीने होऊ शकेल. या प्रकल्पांतर्गत हाती घेण्यात आलेल्या आठपैकी सहा पम्पिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे नाना चौक, ताडदेव, अंधेरी, जुहू, सांताक्रुझ, खार अशा काही परिसरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, मोगरा नाला आणि माहुल पम्पिंग स्टेशनचे काम रखडले आहे.

जागेसाठी प्रयत्न सुरू
मोगरा पम्पिंग स्टेशनसाठी निश्चित केलेली जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया दोन जमीन मालकांच्या वादात न्यायप्रविष्ट आहे. या जागेसाठी ४२ कोटी रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. न्यायालयीन प्रकरणात निकाल लागल्यानंतर ही रक्कम संबंधित मालकाला देण्यात येणार आहे, तर माहुलची जमीन मिठागराची असल्याने, ती ताब्यात घेण्याबाबत उच्चस्तरीय चर्चा सुरू आहे.

अशा आहेत अडचणी...
नाल्यांवरील अतिक्रमणामुळे काही कामे रखडली, अशी तक्रार अधिकारी करीत आहेत, तर जागा मिळत नसल्याने मोगरा आणि माहुल पम्पिंग स्टेशनची कामे रखडली आहेत. माहुल पम्पिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर सायन, कुर्ला अणि माटुंगा येथे पाणी भरणार नाही.

- २००६ मध्ये या प्रकल्पाचा अंदाजित खर्च १२०० कोटी रुपये होता. मात्र, १४ वर्षांनंतर हा खर्च चार हजार कोटींवर पोहोचला आहे.
- नाला रुंदीकरण, पर्जन्य वाहिन्यांची मजबुती अशी ५८ कामे होणार होती. दोन टप्प्यांमध्ये सुरू असलेल्या या कामांपैकी आतापर्यंत केवळ २७ कामे पूर्ण झाली आहेत.
- २८ कामे अद्याप सुरू आहेत. यापैकी शहरात सात, पूर्व उपनगरात १२ आणि पश्चिम उपनगरात नऊ कामे सुरू
आहेत.

Web Title:  14 years after the flood, half of Brimestown project work is incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई