पत्नीला जाळणारा पती १४ वर्षांनी पुन्हा तुरुंगात
By admin | Published: April 12, 2015 01:35 AM2015-04-12T01:35:27+5:302015-04-12T01:35:27+5:30
सर्वोच्च न्यायालयाने अपिलात जन्मठेप ठोठावल्याने पत्नीला जिवंत जाळणाऱ्या अकोला येथील प्रदीप महादेव गाडेकर या पतीची तब्बल १४ वर्षांनंतर पुन्हा तुरुंगात रवानगी होणार आहे.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने अपिलात जन्मठेप ठोठावल्याने पत्नीला जिवंत जाळणाऱ्या अकोला येथील प्रदीप महादेव गाडेकर या पतीची तब्बल १४ वर्षांनंतर पुन्हा तुरुंगात रवानगी होणार आहे. प्रदीपचा भाऊ प्रवीण यालाही आपल्या वहिनीचा विनयभंग केल्याबद्दल सहा महिन्यांची शिक्षा झाल्याने प्रदीपसोबत तोही आता गजाआड होईल.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या दोन्ही भावांना ७ डिसेंबर २००७ रोजी निर्दोष मुक्त केले होते. त्याविरुद्ध राज्य सरकारने केलेले अपील सर्वोच्च न्यायालयात न्या. पिनाकी चंद्र घोष व न्या. उदय उमेश लळीत यांच्या खंडपीठाने शुक्रवारी मंजूर केले. प्रदीपला पत्नी साधनाला जाळल्याबद्दल जन्मठेप व प्रवीणला वहिनीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ६ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. जामिनावर असलेल्या या दोन्ही भावांना तात्काळ अटक करून शिक्षा भोेगण्यासाठी त्यांची तुरुंगात रवानगी करावी, असा आदेशही न्यायालयाने दिला.
मात्र साधनाचा हुंड्यासाठी छळ केल्याच्या गुन्ह्यात प्रदीप व प्रवीण यांना निर्दोष ठरविणारा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला. मूळ खटल्यात या दोघांची आई व मयत साधनाची सासू आरोपी होती. पण तिला सत्र न्यायालयानेच निर्दोष मुक्त केले होते. अशा प्रकारे अकोल्याच्या सत्र न्यायालयाने १४ वर्षांपूर्वी दिलेल्या शिक्षा आता कायम झाल्या आहेत.
६ नोव्हेंबर १९९५ रोजी राहत्या घरात ९६ टक्के भाजलेल्या साधनाचा चार दिवसांनी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्याआधी तिने चार जणांकडे मृत्यूपूर्व जबानी दिली होती. घटनेच्या चार दिवस आधी दीर प्रवीण यांने मिठी मारून आपल्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. परंतु आरडाओरडा केल्याने तो अतिप्रसंग टळला होता. पती प्रदीप नागपूरहून परत आल्यावर आपण ही गोष्ट त्याला सांगितल्यावर त्याने आपल्या अंगावर रॉकेल ओतून साडीचा पदर गॅसवर पेटविला, असे साधनाने या जबान्यांमध्ये सांगितले होते. परंतु या जबान्या परस्परांशी विसंगत आहेत, असे म्हणून उच्च न्यायालयाने त्या विश्वासार्ह मानल्या नव्हत्या. (विशेष प्रतिनिधी)