७२० कोटींच्या बोगस चलनाद्वारे २ व्यापाऱ्यांनी कमविले १४० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2024 11:37 AM2024-10-12T11:37:16+5:302024-10-12T11:37:36+5:30
केंद्रीय वस्तू व सेवा कर खात्याकडून पालघर व ठाण्यातून दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : तब्बल ७२० कोटी रुपयांची बनावट चलने तयार करत ती केंद्रीय वस्तू व सेवा कर खात्याला (जीएसटी) सादर करत १४० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना जीएसटी विभागाच्या मुंबई विभागाने अटक केली आहे. यापैकी एक व्यापारी पालघर येथील आहे तर दुसरा ठाणे येथील रहिवासी आहे.
यापैकी पहिल्या प्रकरणात पालघर येथील अशोक हिरालाल ओझा नावाच्या व्यापाऱ्याने ७० बनावट कंपन्यांची स्थापना केली. या कंपन्यांतून मालाची कोणतीही आवक जावक झाली नाही. मात्र कागदोपत्री मालाच्या व्यवहाराची नोंद करत त्याने जीएसटी विभागाकडे इनपूट टॅक्स क्रेडिटसाठी विवरण भरले. याकरिता त्याने ३२० कोटी रुपयांची बनावट चलने सादर केली होती. याद्वारे त्याने एकूण ४८ कोटी रुपये पदरात पाडून घेतले. लेखापरीक्षणादरम्यान ही बाब उजेडात आल्यानंतर त्याला दि. १० ऑक्टोबरला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
९२ कोटींचे इनपुट क्रेडिट
अशाच प्रकारच्या दुसऱ्या प्रकरणात जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी हितेश वसा नावाच्या व्यापाऱ्याला अटक केली आहे. त्याने २२ बनावट कंपन्यांची स्थापना करत त्याने ४०० कोटी रुपयांची बनावट चलने जीएसटी विभागाला सादर केली आणि त्यावर ९२ कोटी रुपयांचे इनपुट क्रेडिट मिळवले होते. त्याचेही प्रकरण लेखापरीक्षणादरम्यान उजेडात आले. त्यालादेखील अटक करण्यात आली आहे.